गुन्हे शाखेच्या युनिट-१ची कारवाई : कोंढवा व खडक पोलीस स्टेशनमध्ये आठ गुन्हे दाखल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : खुनाच्या प्रयत्नातील सात वर्षे सक्तमजुरी आणि शहर जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार केलेल्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या. गुन्हे शाखेच्या युनीट-१ने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. आरोपीवर खडक व कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
वसिम फक्रुददीन शेख (वय ३३, रा. एस.आर.ए. बिल्डिंग, बी-विंग, खोली क्र.१२५, लेकटाऊनजवळ, कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट-१चे पथकाला शहर जिल्ह्यातून तडीपार गुन्हेगार पत्नीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कात्रजमधील लेकटाऊन येथे सापळा रचून त्याला पकडले आहे. त्याच्यावर खडक व कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक शस्त्र जवळ बाळगणे, तडीपार आदेशाचा भंग करणे असे आठ गुन्हे दाखल आहेत. पुढील कारवाईसाठी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस अंमलदार अमोल पवार, इम्रान शेख, तुषार माळवदकर, सतीष भालेकर, महेश बामगुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.