दत्तवाडी पोलिसांची कामगिरी : २८ एप्रिल २०१५ ते २२ मार्च २०१६ दरम्यान घडला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कोकणात जागा विकसित करुन देतो, असे सांगून ज्येष्ठ नागरिकास तब्बल १ कोटी २५ लाख ५० हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या बांधकाम व्यावसायिकास दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार पर्वतीतील भूमी सोसायटी, सदाशिव पेठेतील श्रीनिवास कन्स्ट्रक्शनचे कार्यालय, तसेच मराठे यांच्या घरी २८ एप्रिल २०१५ ते २२ मार्च २०१६ दरम्यान घडला आहे.
हेमंत विष्णु मराठे (वय ५६, रा. आपटे रोड, शिवाजीनगर) असे या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी संजय कुलकर्णी (वय ६५, रा. अतुलनगर, वारजे) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, हेमंत मराठे बांधकाम व्यावसायिक आहे. हेमंत मराठे आणि संजय कुलकर्णी हे ओळखीचे असून या ओळखीचा गैरफायदा घेऊन मराठे यांनी फ्लॅटचा प्लॅन व इमारत बांधण्याची जागा प्रत्यक्ष दाखवून डेव्हलप करत असलेले अॅग्रीमेंट दाखविले. फिर्यादी यांना सवलत देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रोख व चेकद्वारे १ कोटी २५ लाख ५० हजार १ रुपये वेळोवेळी घेतले.
प्रत्यक्षात त्यांच्याबरोबर कोणताही करार केला नाही. फिर्यादी यांना फ्लॅट व रक्कमही परत न करता फसवणूक केली आहे. या फिर्यादीनंतर दत्तवाडी पोलिसांनी हेमंत मराठे यांना अटक केली आहे. मराठे यांनी आणखी काही जणांची फसवणूक केली असल्याची पोलिसांचा संशय आहे. पोलीस उपनिरीक्षक साळुंखे अधिक तपास करीत आहेत.