शिक्रापूर पोलिसांची कामगिरी : स्वत:च बनाव करून मागितली 5 लाखांची खंडणी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अल्पवयीन मुलीने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचून घरच्यांकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार शिक्रापूर (जि. पुणे) पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. शिक्रापूर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत अल्पवयीन मुलीचा अवघ्या सहा तासात शोध घेऊन तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिहार येथील एका मजुरी करणाऱ्या दाम्पत्याची 15 वर्षाची अल्पवयीन मुलगी घरात कोणाला न सांगता अचानक बेपत्ता झाली. त्यानंतर काही वेळाने मुलीच्या मोबाईवरुन पाच लाख रुपये द्या, पैसे दिले नाही, तर तिचे जीवाचे काही खरे नाही’ असा मेसेज अज्ञाताने तिच्या भावाच्या व्हॉट्सअॅपवर पाठवला. भावाने हा प्रकार आईला सांगितल्यानंतर आईने पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची गुरुवारी (दि.4) तक्रार दिली.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणा द्वारे तपास सुरू करून अपहृत मुलगी ही पुणे ते छपरा अशी रेल्वेने जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी बिहार राज्यातील छपरा रेल्वे पोलीस स्टेशनला अपहृत अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्याचे कळवले. दरम्यान शिक्रापूर पोलीस ठाण्यातील पथक छपारा येथे रवाना करण्यात आले. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान तिच्या मोबाईलवरुन पाठवण्यात आलेला खंडणीचा मेसेज तिनेच पाठवल्याचे समोर आले. तसेच तिने स्वत: च्या अपहरणाचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अल्पवयीन मुलीला तिच्या आई-वडीलांच्या ताब्यात दिले आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागाय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, पोलीस नाईक विकास पाटील, किरण निकम, चित्तारे, शिवणकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.















