पंढरपूर-सोलापूर मार्गावरील घटना : एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : जबरीचोरी करून लुटणाऱ्या चौघांच्या टोळीला पंढरपूर स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. आरोपींकडून एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पंढरपूर-सोलापूर तिऱ्हे मार्गावर अंकोली (ता. मोहोळ) येथे ५ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास पती-पत्नीला लुटले होते.
विजय उर्फ गुंड्या बळीराम कोळी (वय २२, रा. सांगोला चौक, ता. पंढरपूर), संतोष बंडू गायकवाड (वय ३०), दीपक गहिनीनाथ गायकवाड (वय २५), सुभाष सुधाकर वाघमारे (वय 23, तिघे रा. तारापूर, ता. पंढरपूर) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, गोपीचंददादा गवळी पत्नीसह पंढरपूर-सोलापूर तिऱ्हे मार्गे अंकोली (ता. मोहोळ) येथे ५ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री आठच्या सुमारास जात होते. त्यावेळी दोन आरोपींनी शस्त्राच्या धाकाने मोबाईल, सोन्याचे दागिने असा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी पंढरपूर पोलिसांत तक्रार दाखल होती. या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना सूत्रांकडून चोरट्यांची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन तपास केला असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून एक लाख पाच हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. पुढील तपास पंढरपूर पोलीस करीत आहेत.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस उपनिरीक्षक अमितसिद पाटील, सहायक फौजदार शिवाजी घोळवे, पोलीस अंमलदार प्रकाश कारटकर, सलीम बागवान, सचिन गायकवाड, सचिन मागाडे, केशव पवार, शरद कदम, शोएब पठाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
