कोट्यवधी रुपयांचे फसवणूक प्रकरण : पत्नी डिंपल सोमजीचा जामीनासाठी अर्ज
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर वार्षिक 24 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील अनेक नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एम.जी. एन्टप्रायजेसच्या अलनेश अकील सोमजी, डिंपल अलनेश सोमजी (दोघे रा. अमर वेस्टव्हिड, लेन नं. 5, कोरेगाव पार्क, पुणे) यांना पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दिल्ली विमानतळावरुन ताब्यात घेतले. अलनेश सोमजी याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अलनेश सोमजी याच्या पोलीस कोठडीत एक दिवसांची वाढ केली आहे. तर पत्नी डिम्पल सोमजी सध्या न्यायालयीन कोठडीत असून, तिने जामिनासाठी अर्ज केला आहे.
अलनेश सोमजी आणि त्याची पत्नी डिंपल सोमजी यांनी पुण्यातील नागरिकांना 24 टक्के वार्षिक पतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमजी दाम्पत्य फरार झाले होते. आरोपी देशाबाहेर पळून जाऊ नयेत यासाठी पुणे पोलिसांनी 29 ऑक्टोबर रोजी सोमजी दाम्पत्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती.
दिल्ली येथून पुण्यात आणल्यानंतर सोमजी दाम्पत्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने 8 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने अलनेश याच्या पोलीस कोठडीत 3 दिवसांची वाढ केली होती. तर डिम्पल सोमजी हिला 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. डिम्पल सोमजी हिने आज जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर उद्या किंवा परवा सुनावणी होणार आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, अंमलदार सौदाबा भोजराव, अमोल पिलाणे, आशा कोळेकर, हेड कॉन्स्टेबल विजय गुरव, संग्राम शिनगारे, सुरेंद्र जगदाळे, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर, सचिन अहिवळे यांच्या पथकाने केली.
