लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी : १४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : घरफोडी चोरीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून १४ लाख ५० हजार रुपयांचे २८ तोळे सोन्याचे दागिने, एक मोटारसायकल हस्तगत केली. आरोपीकडून तपासात १० गुन्हे उघडकीस आले असून, एक आरोपी लातूरमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
राजू कुंडलिक म्हेत्रे (वय २६, रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे, मूळगाव- शिवाजीनगर, निलंगा, लातूर आणि दस्तगीर वासू शेख (वय २९, रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर परिसरात पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी दोघेजण संशयास्पदरित्या लोणी स्टेशन परिसरात मोटारसायकलवरून फिरत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी सापळा रचून संशयावरून दोघांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांना पाहताच त्यांनी मोटारसायकलवरून पळ काढला. पोलिसांनी तातडीने पाठलाग करून ताब्यात घेत तपास केला. त्यावेळी आरोपींनी लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत दहा गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले. आरोपीकडून १४ लाख रुपये किमतीचे २८ तोळे सोन्याचे दागिने, एक मोटारसायकल असा एकूण १५ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यातील राजू म्हेत्रे हा लातूर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याला यापूर्वी घरफो़डीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळभोर, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजू काळभोर, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, सुनील शिंदे, पोलीस नाईक अमित साळुंखे, श्रीनाथ जाधव, सुनील नागलोत, संभाजी देवीकर, पोलीस शिपाई राजेश दराडे, दिगंबर साळुंखे, बाजीराव वीर, निखील पवार, शैलेश कुदळे यांच्या पथकाने ही धडाकेबाज कामगिरी केली.














