मुंढवा पोलिसांची कामगिरी : अग्नीशस्त्रे जप्त आणि २५ हजार ४०० रुपयांचा ऐवज केला जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणार्या दोघांना मुंढवा पोलिसांच्या तपास पथकानं अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे असा 25 हजार 400 रूपयांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी दिली आहे.
सागर अविनाश कोद्रे (36, रा. सर्व्हे नं. 54, प्रगती गार्डन, बघे वस्ती, मुंढवा) आणि मंगेश बाळासाहेब तांबे (28, रा. खराडकर पार्क, खराडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहाय्यक निरीक्षक एस. के. पोटे, पोलिस अंमलदार भरत उकिर्डे, नाना भांदुर्गे, दिपक कांबळे, दत्ता जाधव, सचिन पाटील पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार नाना भांदुर्गे यांना आरोपींबाबत बातमीदारामार्फत माहिती मिळाली. आरोपी हे गायराण वस्ती, ओम साई चौक येथे येणार असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्याने पोलिस पथकानं वरिष्ठांना माहिती देवून परिसरात साध्या वेशात सापळा रचला. आरोपी परिसरात आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे एक गावठी पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे असा एकुण 25 हजार 400 रूपयाची अग्नीशस्त्रे आढळून आली.
अप्पर आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रदिप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक निरीक्षक एस.के. पोटे, पोलिस अंमलदार नाना भांदुर्गे, भरत उर्किडे, दत्ताराम जाधव, दिपक कांबळे, सचिन पाटील, महेश पाठक, माऊली गिरमकर, निलेश पालवे यांच्या पथकाने केली आहे.














