पत्नीची थेट पोलिसांत तक्रार : पोलिसांनी मध्यस्थी करत भांडण मिटवले
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील एक विचित्र घटना घडल्याचे समोर आले आहे. स्वयंपाक नीट बनवला नाही म्हणून पतीने चक्क पत्नीच्या पाठीचा कडकडून चावा घेतला आहे. जोरात चावा घेतल्याने पत्नीला जखम झाली आहे. या सहनशीलतेला कंटाळून पत्नीने थेट पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल केली. ही घटना भोसरीमध्ये घडली. दरम्यान पोलिसांनी आरोपी पतीला बोलावून समज देऊन दोघांची भांडण मिटवले, अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, 56 वर्षीय आरोपीने पत्नीला स्वयंपाक नीट झाला नाही म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली. त्याचबरोबर मुलीला देखील मारहाण केली असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच यावेळी पतीने मद्यपान केलं होतं. मारहाण करत असताना आरोपी पतीने रागाच्या भरात पाठीचा कडाडून चावा घेतला असं देखील तक्रारीत सांगितलं आहे.
दरम्यान, पती आणि पत्नी उच्चशिक्षित आहेत. पती मद्यपान करून नेहमी पत्नीला मारहाण करत असे. परंतु, पाठीचा कडाडून चावा घेतल्याने पत्नीची सहनशीलता संपली आणि पत्नीने पोलिसात जावून पतीविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून पतीला समज दिला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.















