लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : अपघातानंतर वाहनचालक गेला पळून
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : भरधाव चारचाकीची मोटारसायकलला धडक बसून १९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हडपसर-सासवड रस्त्यावर वडकी (ता. हवेली) येथे १० व्या मैल येथे ५ जानेवारी २०२२ रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास हा अपघात झाला.
साहिल दस्तगीर मुलानी (वय १९, रा. तुकाईदर्शन, कोमल विला सोसायटी, हडपसर) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
आफताब मुलानी (वय २३, रा. हडपसर, पुणे) यांनी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चारचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचा भाऊ मोटारसायकलवरून वडकी येथे जात होता. त्यावेळी भरधाव अज्ञात चारचाकीची जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवरील तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक न थांबता पळून गेला. पोलीस उपनिरीक्षक पी. के. हंबीर पुढील तपास करीत आहेत.

 
			


















