सोलापूर पोलिसांची दमदार कामगिरी : तीन गुन्हे उघड, ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
सोलापूर : घरफोडी, दरोडा, मोटारसायकल चोरीतील सराईत तिघांच्या मुसक्या आवळल्या. तीन गुन्ह्यांची उकल करीत ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सोलापूर एलसीबीच्या पोलिसांनी दमदार कामगिरी केली.
अनिल मनमत शिंदे (वय ३०, रा. वाळूज देगाव, ता. मोहोळ, जि. सोलापूर), बालाजी राजकुमार वेदपाठक (वय ३२, रा. काटी सावरगाव, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद (सराफ) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, योगेश रामदास कापरे (वय ३२, रा. आंबेगाव, ता. हवेली, जि. पुमे) याला मानेगाव ते नरखेड (ता. मोहोळ) येथे तीन अज्ञातांनी चाकूच्या धाकाने मारहाण करीत दोन तोळे सोन्याची चैन, तीन अंगठ्या, रोख एक लाख ३० हजार रुपये किंमतीचा असा एकूण दोन लाख ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. हा गुन्हा वाळूज देगाव व जामगाव, ता. मोहोळ येथील सराईत गु्न्हेगारांनी केल्याची माहिती सूत्रांकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एकाला ताब्यात घेऊन तपास केला असता, त्याने चार-पाच महिन्यापूर्वी पाच आरोपींनी मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली.
 माढा व सोलापूर पोलीस ठाण्यातील चोरलेले दागिने काटी सावरगाव (ता. तुळजापूर) येथील सराफास विकल्याचे सांगितले. आरोपीसह त्याचे साथीदार अट्टल गुन्हेगार असून, त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. माढा पोलीस स्टेशनचे घोंगडे पुढील तपास करीत आहेत.
सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहायक फौजदार ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहिनी भोगे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, समीर शेख यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

 
			

















