नगरसेवकपद वाचविण्याचा प्रयत्न : घोगरेच्या साथीदारांनी ठेकेदाराचे अपहरण करून मारहाण केल्याचा प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : वानवडी आणि दत्तवाडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक आणि अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांचा पोलीस शोध घेत असताना, त्यांनी पुणे महापालिकेच्या मुख्य सभेस उपस्थित राहू शकणार नसल्याने रजेचा अर्ज टाकला आहे. नोव्हेंबर महिन्यापासून घोगरे मुख्य सभेमध्ये अनुपस्थित आहेत. ते जानेवारीच्या मुख्यसभेला अनुपस्थित राहिल्यास त्यांचे नगरसेवक पद रद्द झाले असते. आपले पद वाचविण्यासाठी त्यांनी रजेचा अर्ज सादर केला आहे.
पुणे महापालिकेत काम मिळवून देण्यासाठी भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी ठेकेदाराकडून पैसे घेतले होते. मात्र, त्यानंतरही काम मिळत नसल्याने त्यांनी पैसे परत मिळण्याचा तगादा लावला होता. घोगरे व त्यांच्या साथीदारांनी ठेकेदाराला मारहाण केल्याने त्यांच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या ठेकेदाराने त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दत्तवाडी पोलिसांनी दिली त्यामुळे घोगरे यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
नोव्हेंबर महिन्यामध्ये हा प्रकार घडल्यानंतर घोगरे यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा सुरू झाला आहे. त्यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी देखील प्रयत्न केले. पण, त्यामध्ये त्यांच्या बाजूने निकाल लागला नाही. त्यामुळे अटकेची टांगती तलवार घोगरे यांच्यावर आहे. दरम्यान, घोगरे हे पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत उपस्थित राहतील अशी शक्यता असल्याने मागील महिन्याच्या मुख्य सभेच्या वेळेस पोलिसांनी महापालिकेत सापळा देखील लावला होता. मात्र, घोगरे हे अनुपस्थित राहिले.
महापालिकेच्या नियमानुसार कोणतीही पूर्वसूचना न देता नगरसेवक सलग तीन महिने मुख्य सभेस अनुपस्थित राहिल्यास त्यांचे नगरसेवक पद आपोआप रद्द होते. घोगरे हे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात अनुपस्थित राहिले आहेत, तर आता 20 जानेवारी रोजी तिसरी मुख्य सभा होणार असल्याने त्यासही गैरहजर राहिल्यास घोगरे यांचे पद धोक्यात आले असते. त्यामुळे त्यांनी नोव्हेंबर २०२१ पासूनचा रजेचा अर्ज मुख्यसभेला सादर करण्यासाठी नगर सचिव कार्यालयात दिला आहे.
कार्यकर्त्याने सादर केला अर्ज…
स्थानिक पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेचे पोलीस घोगरे यांच्या मागावर आहेत. त्यामुळे ते स्वतः येऊन रजेचा अर्ज देऊ शकले नाहीत. मात्र, एका कार्यकर्त्याने त्यांच्या स्वाक्षरीचा अर्ज घेऊन आला होता. रजेचा अर्ज देण्यासाठी नगरसेवकाने स्वतः उपस्थित रहावे असे बंधन नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
