कोंढव्यातील घटना : कॉलर धरल्याच्या रागाने मोटारसायकलने दिली धडक
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : दुकानात खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याने तिने त्याची कॉलर पकडली. त्याचा राग मनात धरुन त्याने कारने मोटारसायकलला धडक देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी विनयभंग व खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.
समीर अहमद सय्यद (वय ३८, रा. गुरुवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोंढव्यातील एका ३५ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी या त्यांच्या पतीसह कॅम्पमधील एका इलेक्ट्रीकल्स दुकानात ११ जानेवारीला खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी समीर याने फिर्यादींच्या गालाच्या रंगावरुन त्यांची जात विचारल्याने फिर्यादी यांनी आरोपीची कॉलर धरली. तेव्हा त्याने फिर्यादीच्या कमरेजवळ मिठी मारुन त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर दुसर्या दिवशी १२ जानेवारी रोजी दुपारी फिर्यादी व त्यांचे पती मोटारसायकलवरुन साळवे गार्डन रोडवरुन जात होते. त्यावेळी आरोपीची कॉलर धरल्याचा राग मनात धरुन मोटारीने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. त्यात ते जखमी झाल्यावर त्यांच्या अंगावर मोटार घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून तो तेथून पळून जाऊ लागला. तेव्हा शिवशंभोनगर येथील लोकांनी अडविल्यावर फिर्यादी यांनी तू अशी गाडी का चालवतोय, असे विचारले असता त्याने फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. तेव्हा नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. सहायक पोलीस निरीक्षक मधाळे अधिक तपास करीत आहेत.
