भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : कात्रजमधील मस्तानी हॉटेलसमोर घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : तू आमच्या भांडणामध्ये का आला असे म्हणत लोखंडी रॉड डोक्यात घालून लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्यास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या साथीदाराचा पोलीस तपास करीत आहेत. कात्रजमधील मस्तानी हॉटेलसमोर १२ जानेवारी २०२२ रोजी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.
सूरज दिगंबर शेजूळ (वय २७, रा. साई निसर्ग अपार्टमेंट, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मानव करपे (वय २४, रा. बालाजीनगर, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, कात्रजमधील मस्तानी हॉटेलसमोर फिर्यादीला अडवून तू आमच्या भांडणामध्ये का आला, आज तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून आरोपीने त्याच्या साथीदारासह लोखंडी रॉडने डोक्यात मारून खाली पाडले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार पुढील तपास करीत आहेत.
