वाकड पोलिसांची कारवाई : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पोलीस शिपायाचे प्लॅनिंग उघड
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : तीनशे कोटींची करन्सी व पैशाच्या हव्यासापोटी अपहरण करून खंडणी मागणाऱ्या मुख्य सूत्रधार आणि पोलीस कर्मचाऱ्यासह आठजणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रफिक अलाउद्दीन सय्यद (वय ३८) यांनी विनय सुंदरराव नाईक (रा. ताथवडे, पुणे) यांचे सात-आठजणांनी ताथवडे येथील हॉटेल समाधान येथून अपहरण केल्याची फिर्याद वाकड पोलिसांत दिली.
सुनील राम शिंदे (रा. खारदांडा, मुंबई), वसंत श्यामराव चव्हाण (रा. नालासोपारा, मुंबई), फ्रान्सिस टिमोटी डिसोझा (रा. कल्याण, जि. ठाणे), मयूर महेंद्र शिर्के (रा. खार, मुंबई), प्रदीप काशिनाथ काटे (रा. दापोडी, पुणे), शिरीष चंद्रकांत खोत, रा. उलवे, नवी मुंबई), संजय ऊर्फ निकी राजेश बंसल (रा. उलवे, नवी मुंबई), दिलीप तुकाराम खंदारे (रा. भोसरी, पुणे, मूळगाव- मु.पो. कोनाटी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) अशी अटक केलेल्या आठजणांची नावे असून, पोलीस कोठडीमध्ये आहेत.
अपहृत व्यक्तीचा मोबाईल, अपहरण झालेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा तपास सुरू केला. आरोपींना पोलिसांचा सुगावा लागताच विनय सुंदरराव नाईक वाकडमधून पलायन केले. दरम्यान, दिलीप तुकाराम खंदारे याच्याबाबत तपास केला असता, तो पिंपरी-चिंचवड आयुक्तालयामध्ये शिपाईपदावर कार्यरत असून, तो गैरहजर असल्याची माहिती मिळाली. त्याच्या मोबाईलवरून शोध घेतला असता तो भोसरीमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास करून खंदारे यास भोसरीतून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता नोकरीमध्ये असताना सेवाअंतर्गत ऑफिस ऑटोमेशन, सायबर गुन्हे प्रणाली, ॲडव्हान्स सायबर क्राईम इनव्हेस्टिगेशन टेक्नॉलॉजी, बेसिक ऑफ हार्डवेअर अँड नेटवर्क इन्फॉर्मेशन, मोबाईल फॉरेन्सिक असे कोर्स केल्याचे तपासात उघड झाले. सायबर क्राईम पुणे विभागात नोकरीला असताना त्याला विनय सुंदरराव नाईक (रा. ताथवडे) याच्याकडे ३०० कोटी रुपयांची बिट कॉईन व क्रिप्टो करन्सी असल्याची माहिती मिळाली, त्याचे अपहरण केले, तर भरपूर पैसे व क्रिप्टो करन्सी मिळेल. त्यामुळे त्याने जोडीदाराच्या मदतीने ताथवडेतील समाधान हॉटेलमधून विनय नाईकचे अपहरण केल्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल करीत आहेत.














