गुन्हे शाखा युनिट-३ची कारवाई : फरार आरोपीला मोरगाव येथून केली अटक
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) व खुनाचा प्रयत्न तसेच खंडणीसाठी मारहाण केल्याप्रकरणात फरार असलेल्या निलेश घायवळ टोळीतील एकाला गुन्हे शाखेच्या युनिट 3 च्या पथकाने मोरगाव (जि. पुणे) येथून अटक केली.
गणेश सतीश राऊत (वय-31 रा. ज्ञानेश्वर कॉलनी, डीपीरोड, कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गणेश राऊत याच्यावर पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारहाण, धमकावणे व हत्यार बाळगल्याप्रकरणी मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील गुन्हेगारांवर प्रतिबंध करण्यासाठी फरार आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मंगळवारी (दि.8) वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, उपनिरीक्षक दत्तात्रय काळे व पोलीस अमंलदार आरोपीचा शोध घेत होते.
पोलीस शिपाई राकेश टेकावडे यांना कोथरुडच्या मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी गणेश राऊत हा मोरगाव येथील एसटीस्टँड येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने एसटी स्टँडजवळ सापळा रचून आरोपी गणेश राऊत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला पुढील तपासासाठी कोथरुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार महेश निंबाळकर, संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, राकेश टेकावडे यांच्या पथकाने केली.
