वारजे पोलिसांत फिर्याद : गोकुळनगर येथे कार अडवून तरुणावर कोयत्याने वार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : ‘मी इथला भाई आहे,’ असे म्हणून कारमधून जाणार्या तरुणाला अडवून त्याच्या गळ्यावर कोयत्याने वार करुन एका गुंडाने वारजे माळवाडीत भर रस्त्यावर राडा घातला. वारजे माळवाडी पोलिसांनी या गुंडाला अटक केली आहे.
शुभम अनिल सुद्देवार (वय २८, रा. चैतन्य चौक, पारगे बिल्डींग, वारजे) असे या गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी अनिकेत नवनाथ साष्टे (रा. गोकुळनगर, वारजे माळवाडी) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व त्यांची पत्नी हे चारचाकी गाडीमधून सोमवारी रात्री आठ वाजता वारजे माळवाडीतील गोकुळनगर येथे जात होते. त्यावेळी शुभम सुद्देवार हा रस्त्यात आडवा उभा राहून, त्याने फिर्यादीचा जाण्याचा रस्ता अडविला. तेव्हा फिर्यादी याला समजावून सांगत असताना त्याने शर्टच्या आत लपवलेला कोयता बाहेर काढला. मी इथला भाई आहे, असे म्हणून फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गळ्यावरुन कोयता फिरविला. फिर्यादीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जमलेल्या लोकांवर हातातील कोयता फिरवून दहशत निर्माण केली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक होळकर तपास करीत आहेत.
