वारजे पोलिसांत फिर्याद : कर्वेनगरमधील शाहू कॉलनीतील घटना
महाराष्ट्र 360 न्यूज नेवटर्क
पुणे : गळ्यातील मंगळसुत्र, दागिने मोटारसायकलवरुन आलेले चोरटे हिसकावितात, म्हणून महिलेने दागिने बॅगेत ठेवले, तर चोरट्यांनी दागिने असलेली हँड बॅग हिसकावून चोरून नेली. कर्वेनगरमधील शाहु कॉलनीतील गल्ली क्र.2 मध्ये शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली.
या प्रकरणी कर्वेनगरमध्ये राहणाऱ्या एका २६ वर्षाच्या महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी या रात्री पायी घरी जात होत्या. शाहु कॉलनीतील गल्ली क्र.२ मध्ये त्या आल्या असताना मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्याजवळ असलेली हँड बॅग हिसका मारुन चोरुन नेली. बॅगेमध्ये १ लाख २९ हजार रुपयांचे ३० ग्रॅमचे सोन्याचे दागिने, १० हजार रुपयांचा मोबाईल, १ हजार रुपये रोख असा १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज होता. सहायक पोलीस निरीक्षक रायकर तपास करीत आहेत.















