बस वाहकाची सतर्कता : बार्शी पोलिसांनी दिले पालाकांच्या ताब्यात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : घरी आई-वडिलांसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून दोन चिमुकल्यांनी थेट घर सोडून पुणे गाठण्याचा निर्णय घेतला. मात्र बस वाहकाच्या सतर्कतेमुळे ते दोन्ही मुले बार्शी पोलिसांनी सुखरूप पालकांच्या ताब्यात दिली.
बार्शी शहरातील एस. टी. स्टॅंड येथे दोन अल्पवयीन मुले बालस्नेही कक्षामध्ये आले असल्याची बातमी मिळाल्याने बार्शी शहर पोलीस ठाणेकडील अंमलदार पो. ना. अमोल माने, सचिन देशमुख, अविरत बरबडे यांनी एस.टी. स्टॅंड येथे जावुन चौकशी केली असता सदरची दोन मुले मिळुन आली. त्यांच्या बाबत विचारणा केली असता त्यांनी त्यांची नावे सार्थक समाधान सरवदे वय. ११ वर्ष, सोहम विशाल मिरवणे वय. ०८ वर्ष दोघे रा. तेरखेडा जि. धाराशिव येथिल असल्याचे सांगुन आई -वडीलाबरोबर भांडण झाल्याने त्या रागाच्या भरात कोणास काही न सांगता सकाळी एस.टी.ने. तेरखेडा येथुन पुणे येथे जाणार असल्याचे सांगितले. बार्शी एस. टी. स्टॅंडवर आलेली असताना एस. टी. वाहकाकडुन त्यांना सोबत घेवुन बालस्नेही कक्षामध्ये आणुन त्यांनी याची माहिती पोलीसांना दिली. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी व स.पो.नि. ज्ञानेश्वर उदार यांनी समुपदेशन करून आम्ही या पुढे आई वडीलांना न सांगता बाहेरगावी कोठेही जाणार नसल्याचे सांगीतले. सदर मुलांच्या पालकांना संपर्क साधुन बोलावुन घेतले व त्यांना सुरक्षित पालकांच्या ताब्यात दिले.















