भारतीय जैन संघटनेतर्फे आयोजन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : भारतीय जैन संघटना, पुणे विभाग आयोजित उच्च शिक्षित वधु वर परिचय संमेलन पुणे येथील महावीर प्रतिष्ठान येथे अतिशय उत्साहात पार पडले. या परिचय संमेलनाचे उदघाटन विजयकांत कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी पुणे विभागाची सर्व टीम मागील 2 महिन्यांपासुन परिश्रम घेत होती. हा कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने मोठया उत्साहात यशस्वीपणे पार पडला.
या संमेलनात उच्च शिक्षित 182 युवक-युवतींनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी 106 मुले आणि 76 मुलींनी आपल्या पालकांसह उपस्थित राहून सहभाग घेतला होता. भारतीय जैन संघटनेचे ट्रस्टी तथा माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख आणि राष्ट्रीय वधु-वर संमेल्लन प्रमुख अनिल रांका यांनी सर्व युवक युवती यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखत घेताना उमेदवारांबरोबर त्यांच्या पालकांचेही प्रबोधन केले. तसेच मुलींची विशिष्ट शहरांबाबतची अपेक्षा, पत्रिका पाहणे, जोडीदार कसा असावा याविषयी योग्य ते मार्गदर्शन केले.
भारतीय जैन संघटना, पुणे विभागातर्फे जैन समाजातील उच्च शिक्षित मुलामुलींसाठी त्याच प्रमाणे पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी सुद्धा परिचय संमेलन आयोजित केले जाते. सन 2011 पासून आतापर्यंत अशी दोन्ही प्रकारची मिळून एकूण 24 परिचय संमेलने आयोजित करण्यात आली आहेत.