लोणी काळभोर पोलीसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : टोळी प्रमुख वैभव ऊर्फ गोट्या तरंगे व त्याच्या २ साथीदाराविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. लोणी काळभोर पोलीसांनी ही कारवाई केली.
वैभव ऊर्फ गोट्या तरंगे, (वय २० वर्षे रा. दत्तवाडी, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे), सागर सिन्हा, (वय १९, रा. उरुळी- कांचन, ता. हवेली, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. यश लोणारी, (रा. तुपे वस्ती, पुणे) हा पाहिजे आरोपी आहे.
वैभव तरंगे याला फोन करण्यासाठी यातील फिर्यादी यांनी त्यांचा फोन दिला. हा फोन फिर्यादीस परत देत नसल्याने फिर्यादी यांनी त्यांचा फोन त्याच्या हातामधुन परत घेतला. हा राग मनात धरून फिर्यादी हे त्यांच्या रुम मधील सदस्यांसह झोपलेले असताना, वैभव तरंगे व त्याच्या इतर दोन साथीदार यांनी फिर्यादी यांच्या रुमच्या दरवाज्यावर लाथा मारुन त्यांना रुमच्या बाहेर घेऊन त्यांना मारहाण केली. त्यांचा भाऊ हा मध्ये आला असता, वैभव तरंगे याने तुम्ही बाहेरच्या राज्यातील लोक इथे येऊन आम्हाला शिकवता का, तुम्हाला आज जिवंत सोडणार नाही असे म्हटले. वैभव तरंगे याच्या हातामध्ये असलेल्या प्लायवुडचे चौकोनी लाकडी फळीने फिर्यादीच्या भावाच्या डोक्यात जीवे मारण्याच्या उद्देशाने जोरात फटका मारला. त्यांना जबर मारहाण करुन इच्छापुर्वक गंभीर दुखापत केली आहे. तसेच फिर्यादीस फळीने, लाथा-बुक्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांच्या रुम जवळील व रुममध्ये रहात असलेले तेथे जमलेल्या लोकांना उद्देशुन आम्ही इथले भाई आहे, कोणीही आमच्या मध्ये यायचे नाही, कोणी आले तर, आम्ही त्याचा पण कार्यक्रम करु असे म्हणुन दहशत निर्माण केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या हातामधील लाकडी फळ्या हवेमध्ये फिरवत दहशत करत तेथुन निघुन गेले. त्यामुळे वैभव तरंगे व त्याच्या दोन अनोळखी साथीदार यांच्या विरुध्द फिर्यादी यांनी तक्रार केली.
दाखल गुन्हयाच्या तपासा दरम्यान आरोपी वैभव ऊर्फ गोट्या तरंगे हा लोणी काळभोर पोलीस स्टेशन अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली असून, त्याने बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तींसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळवण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी संघनेचा सदस्य म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर केला. हिंसाचार करण्याची धमकी देऊन किंवा धाकदपटशा दाखवुन , जुलूम जबरदस्ती करुन किंवा अवैध मार्गाने आपली बेकायदेशीर कृत्य चालु ठेवली. संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे संयुक्त गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला आहे. टोळीने मागील १० वर्षात खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, दुखापत, हमला किंवा गैरनिरोध करण्याची पूर्वतयारी करुन नंतर गृह-अतिक्रमण करणे, बेकायदेशीररीत्या हत्यारे बाळगुन दहशत निर्माण करणे इत्यादी प्रकारचे गुन्हे केले आहेत. यातील आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीच्या मार्गाने स्वतःच्या अर्थिक फायदयाकरीता गुन्हा केल्याचे दिसुन आले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार,अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, रंजन कुमार शर्मा, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०५, आर. राजा, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, किशोर पवार, शिवशांत खोसे, सर्वेलन्स पथकाचे पोलीस अंमलदार, तेज भोसले, संदीप धनवटे, आशितोष गवळी, मल्हारी ढमढेरे, रोहिणी जगताप यांनी केली आहे.
मोक्का अंतर्गत केलेली ही ९९ वी कारवाई आहे.