शब्दसारथीतर्फे विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि अस्ताला न जाणारे सूर्य आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि शिवव्याख्याते मोहन शेटे यांनी व्यक्त केले.
‘शब्दसारथी’च्या वतीने घेण्यात आलेल्या अनुभवू गजानना, अभिवाचन स्पर्धा आणि शब्दवेध कथालेखन स्पर्धा या राज्यस्तरीय स्पर्धाचा पारितोषिक वितरण सोहळा मराठा चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर साईनाथ मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियुष शहा, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मनीषा पोतदार, कथाकथनकार पल्लवी पाठक, शब्दसारथीचे संचालक पराग पोतदार उपस्थित होते. यनिमित्ताने पुण्या मुंबईसह सातारा, ठाणे, नाशिक, कोल्हापूर येथूनही विजेते विद्यार्थी आले होते. 60 हून अधिक मुलांना गौरवचिन्ह, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. या सर्वच मुलांवर कौतुकाचा वर्षाव आणि प्रोत्साहनाची थाप देण्यात आली.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात संध्याकाळपासूनच मुलांची लगबग आणि किलबिलाट सुरु झालेला होता. निमित्त होते त्यांच्याच कौतुक सोहळ्याचे…! शब्दसारथीच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी हे चिमुकले उत्साहाने आले होते. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या चेहऱ्यावरील कौतुक आणि अभिमान बरेच काही सांगून जात होता.
मोहन शेटे यांनी ओघवत्या वाणीने सर्वांचीच मने जिंकली.. ते म्हणाले, नुसती त्यांच्या पेहरावाची नक्कल करून भागणार नाही त्यांचे गुण आपल्यात उतरण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अवघ्या लहान वयापासून शिवरायांनी जे स्वप्न पाहिले तशी मोठी स्वप्ने पाहून आपल्या क्षेत्रात सर्वोच्च जाण्याचा प्रयत्न मुलांनी करावा. शब्दसारथीच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांचे पियुष शहा यांनी कौतुक केले. मुलांना प्रोत्साहन देणारे आणि भाषेचे महत्त्व जपणारे हे उत्तम व्यासपीठ असल्याचे गौरवोदगार त्यांनी काढले.
शब्दसारथीचे संचालक पराग पोतदार यांनी प्रास्ताविक केले आणि विविध वेगळ्या उपक्रमांचा आढावा घेतला. सूत्रसंचालन अश्विनी सप्तर्षी यांनी केले. प्रीती पोतदार यांनी बक्षीसांची घोषणा केली. डॉ. मनीषा पोतदार यांनी आभार मानले.
