पी.सी.बी. गुन्हे शाखेची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे:- विमानतळ पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या रोहन गायकवाड गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पी.सी.बी. गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
रोहन गायकवाड, (वय २५ वर्ष, रा. स.नं. २४७, फाळके चौकाजवळ, कलवड वस्ती, लोहगाव) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
त्याला अमरावती मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश देण्यात आले आहेत.
पुणे पोलीस आयुक्तालयातील विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे करणारा हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिस्टल, तलवार, लोखंडी रॉड, पालघन, कोयता या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत, अपहरण दुखापत, दंगा, बेकायदेशीर अग्निशस्त्र व हत्यारे बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षामध्ये त्याच्या विरूध्द ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन आनंदराव खोबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा, चंद्रकांत बेदरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.
स्थानबध्दतेची ही ९० वी कारवाई आहे.
