महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल
पुणे : जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या विविध धार्मिक स्थळांना पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन तेथील पावित्र्य संकटात आले होते. परंतू अल्पसंख्यांक आयोगाचा सदस्य या नात्याने ही अडचण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवली, असता पंतप्रधानांनी जैन समुदायाच्या भावनांची कदर करीत तातडीने त्या निर्णयास स्थगिती देऊन जैन बांधवांच्या भावनांचा आदर राखला.
भविष्यात देखील अल्पसंख्यांक आयोगाच्या माध्यमातून समाजाच्या समस्या सोडवणार, अशी ग्वाही भारत सरकार नॅशनल ट्रेडर्स वेलफेअर बोर्डचे चेअरमन, अखिल भारतीय श्री जैन श्वेताम्बर मुर्तिपूजक युवक महासंघाचे आंतर्राष्ट्रीय अध्यक्ष आणि अल्पसंख्यांक आयोगाचे मा. सदस्य सुनील जे. सिघी यांनी दिली.
श्री जैन श्वेताम्बर मूर्तिपूजक युवक महासंघ पुणे शाखेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण आणि सत्कार समारंभात ३ मार्च २०२४ रोजी पुणे येथे प्रमुख पाहुणे म्हणून सिघी बोलत होते.
स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर श्री जैन श्वेताम्बर मुर्तिपूजक युवक महासंघाचे अध्यक्ष सतीश बी. शहा, प्रदेशाध्यक्ष अचल जैन, राष्ट्रीय अध्यक्ष हरेश शहा, जीतो एपेक्सचे अध्यक्ष कांतीलाल एच. ओसवाल, नवनिर्वाचित अध्यक्ष विलास शहा, सचिव समीर जैन, भरतभाई शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी २०२४-२५ या वर्षासाठी निवडण्यात आलेल्या अध्यक्षांसह २०२५-२६ या वर्षाच्या अध्यक्षपदासाठी ललित गुंदेशा यांचे नावे घोषित करण्यात आले. याप्रसंगी श्री जैन श्वेताम्बर मुर्तिपूजक युवक महासंघाच्या कार्यकारीणीच्या विविध पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली.
यावेळी बोलताना सुनील जे. सिघी म्हणाले की, जैन समाज मोठ्या प्रमाणावर व्यापार क्षेत्रात कार्यरत असून व्यापाऱ्याशी संबंधीत परवाने मिळण्यातील अडचणी, कालबाह्य झालेले नियम आणि कायदे रद्दबादल करीत व्यापारी सुरळीत पद्धतीने व्यापार करू शकतील या दृष्टीने बदल करणे सुरू आहे.
यासाठी समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या आर्थिक विकासासाठी कार्यरत राहणे यासाठी मी काटिबध्द आहे. यावेळी बोलतांना कांतिलाल ओसवाल म्हणाले की, आपण संघटनेच्या माध्यमातून जे चौकटबद्ध कार्यक्रम करतो, त्यातून बाहेर पडले पाहिजे, जितोच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणासाठी आपण कार्य करीत आहोतच, परंतू त्याबरोबर भविष्यातील आव्हानांना वेध घेत त्यांना सामोरे जाणारी कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे आवश्यक आहे.
नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यास अहवालानुसार आधीच अल्पसंख्यांक असलेला जैन समुदाय अजून अल्प होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, ही आपल्या समाजाच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. हे प्रश्न हातात घेऊन संघटनेने त्याची उत्तरे शोधण्याचे काम केले पाहिजे.
