चंदननगर पोलिसांची कामगिरी : मोबाईलवर फोनवरून केली होती दहा हजाराची मागणी
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पैशासाठी अपहरण करून मारहाण करणाऱ्या अपहरणकर्त्यांना खराडी पोलिसांनी जेरबंद करून अपहरणकर्त्याची सुटका केली. खराडी बायपास रस्त्यावर दुर्गामाता मंदिराजवळ ३ सप्टेंबर २०२१ रोजी ही घटना घडली.
मुकेश मनोज जाधव (वय २१, रा. बीडी कामगार वसाहत, मातोरी बिल्डिंग, नागपाल रोड, पुणे), मनोहर काशीराम जाधव (वय २३, रा. किनारा हॉटेल, न्हावरा फाटा, शिरूर, पुणे, विनोद शंकर चव्हाण (वय २४, रा. बोराटे वस्ती शेजवळ पार्क, चंदननगर, पुणे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. ३५ वर्षीय फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीकडे काम करणारा कुक विश्वसजीत पाल याला आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करीत टमटममध्ये बसवून अपहरण करून पळवून नेले. तेथून त्याच्या फोनवरून फिर्यादीला फोन करीत जीवे मारण्याची धमकी देत दहा हजार रुपये खंडणीची मागणी केली होती.
पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी जात असताना आरोपींचा फोन सुरू होता. त्याला पैसे घेऊन येत असल्याचे सांगितले. दरम्यान, फॉरेस्ट पार्क येथून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन अपहरण केलेल्याची सुटका केली. पुढील तपास चंदननगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक टापरे करीत आहेत
