गूढ आवाज अन् इमारतींना कंपने : भूकंपमापन यंत्रणेचा मात्र दुजोरा नाही
सोलापूर : पवन श्रीश्रीमाळ
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास भूकंपसदृश धक्क्याने सोलापुरात घबराट पसरली. गूढ आवाज अन् इमारतींना कंपने जाणवल्याने अनेक लोक रस्त्यावर जमा झाले. मात्र या कंपनाविषयी भूकंपमापन यंत्रणेने मात्र अजूनपर्यंत कोणताही दुजोरा दिलेला नाही.
सोलापूर शहराला शनिवारी रात्री ११.४७ ते १२ वाजण्याच्या दरम्यान भूकंपाचा धक्का बसल्याचे वृत्त एका संकेतस्थळावरून देण्यात आले. या वृत्ताला अधिकृत भूकंपमापन यंत्रणेचा मात्र कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. शहरवासीय मात्र गूढ आवाज अन् इमारतीला कंपन जाणवल्याने घराबाहेर पडले. दरम्यान, भूकंप ३.८ असल्याचेही बोलले जात आहे.
विजयपूरसह कर्नाटकात जाणवला धक्का या संकेतस्थळावरून देण्यात आलेल्या वृत्तात सोलापूरसह कर्नाटकातील सिंदगी, विजयपूर, बसवणबागेवाडी या शहरामध्ये भूकंपाचा धक्का जाणवल्याचे वृत्त दिले आहे. वस्तुतः त्याला कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.
तथापि विजयपुरातील काही नागरिकांशी संपर्क साधला असता त्यांनीही धरणीकंप झाल्याचे सांगितले.
सात रस्ता परिसरातील कृष्णा अपार्टमेंटमधील प्रमोद शास्त्री यांनी सांगितले की, आम्ही घरात झोपलो असताना आमची इमारत अचानक हादरायला लागली. साधारण चार मिनिटे ही कंपने जाणवली. लगेचच आम्ही घरातील सर्व मंडळी गॅलरीत आलो. भवानीपेठ परिसरातील रस्त्यावर पाहिले तर रहिवाशांनाही हा हादरा जाणवला. समोरच्या इमारतीतील अनेक लोक भूकंपाचा धक्का असल्याचेच स्पष्ट बोलतानाचे दिसून आले.
