सुमारे साडेचार लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : घरफोडी चोरीचे एकूण १० गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणला यश आले आहे.
आरोपीकडून एकूण ५८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, २६० ग्रॅम वजनाची चांदी असा एकूण ४,४८००० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सोलापूर ग्रामीण जिल्हयातील मालाविषयी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आदेश दिले होते.
त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेऊन त्यांना मालाविषयी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले. वैराग पोलीस ठाणे हद्दीतील मौजे जामगाव ता. बार्शी येथील फिर्यादी पोपट मस्के यांच्या राहत्या घराचे मुख्य दरवाजाचे कुलुप तोडून घरातील लोखंडी कपाट उचकटून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १,३०,२३९ रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.
वैराग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.सह पोलिस निरिक्षक नागनाथ खुणे व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार प्रकाश कारटकर यांना गुन्हा करणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली होती. त्यावरून नागनाथ खुणे व त्यांचे पथक आरोपीचा लातुर, उस्मानाबाद इत्यादी ठिकाणी शोध घेत असताना गुन्हा करणारा आरोपी हा वैराग गांवातील बसस्थानकाजवळ येणार असल्याबाबत माहिती मिळाली.
तेथे जाऊन सापळा लावून त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता तो सुरूवातीला उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. त्यानंतर त्याला विश्वासात घेवून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने मौजे जमगाव ता. बार्शी जि. सोलापूर या गावातील घरफोडी गुन्हा केला असल्याचे कबुल केले.
त्याच्याकडे आणखीन कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सोलापूर जिल्हयात मागील २ वर्षापासून वैराग येथील मौजे शिवाजी नगर, दत्त नगर, घोंगडे प्लॉट, खरटमल प्लॉट वैराग, भालगांव, तसेच बार्शी येथील व्हनकळस प्लॉट अलीपूर रोड बार्शी, बारूंगुळे प्लॉट बार्शी, धस पिंपळगांव बार्शी इत्यादी ठिकाणी दिवसा घरे फोडली असल्याची कबूली दिली.
आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरूध्द सोलापूर व उस्मानाबाद, लातुर, बुलढाणा जिल्हयात तसेच तेलंगना राज्यात मालाविषयी १५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी शिरीष सरदेशपांडे पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, प्रितम यावलकर अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सुरेश निंबाळकर यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, पोसई – रविराज कांबळे, सफौ -शिवाजी घोळवे, पोलीस अंमलदार प्रकाश कारटकर, रवि माने, अजय वाघमारे, अन्वर अत्तार, सुरज रामगुडे, यश देवकते यांनी बजावली आहे.
