महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : चिरफाड न करता विना टाक्याच्या पाच अवघड हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
बार्शीतील डाॅक्टर संजय अंधारे संचलित सुश्रुत मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या वतीने पाच रूग्णांवर हृदयातील छिद्र बुजविण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या. या सर्व शस्त्रक्रिया Button Closure या पद्धतीने म्हणजेच शरीराची कोणतीही चिरफाड न करता विना टाक्याच्या करण्यात आल्या.
पुणे येथील बी. जे. मेडिकल काॅलेज व हाॅस्पिटल येथे कार्यरत असणारे प्रसिद्ध हृदयरोग चिकित्सक डाॅ. हेमंत कोकणे व सोलापूर येथील हृदयरोगतज्ञ डाॅ दीपक गायकवाड यांनी या शस्त्रक्रिया केल्या.
त्यांना सुश्रुत हाॅस्पिटल येथील कार्डियाक कॅथलॅब मधील स्टाफचे सहकार्य लाभले.
आतापर्यंत अशा प्रकारच्या 20 शस्त्रक्रिया सुश्रुत हॉस्पीटलमधे यशस्वीरित्या पार पाडण्यात आल्या आहेत. या सर्व शस्त्रक्रिया महाराष्ट्र सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत मोफत करण्यात आल्या.
