कल्याणीनगर भागातील घटना : १७ लाखाचे दागिने येरवडा पोलिसांनी केले हस्तगत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कल्याणीनगर परिसरात घरात मोलकरनीचे काम मिळवून, चोरी करत असलेल्या महिलेस येरवडा पोलिसांनी सातारा जिल्ह्यात जावून अटक केली आहे. तिच्या कडून पोलिसांनी दोन गुन्ह्यातील १७ लाख ११ हजाराचे चोरी केलेले दागिने ताब्यात घेतले आहेत.
कल्याणीनगर येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये दि. २८ मे रोजी घरातील मोलकरीण ही फिर्यादी संजीव गुप्ता यांच्या घरात कामाला होती. त्यांच्या कपाटातून १३,३६,८००/- रु. किंमतीचे सोन्या -चांदीचे दागिने चोरी करुन घेवून गेली होती. या बाबत येरवडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्हयाचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार तुषार खराडे, किरण घुटे व सुशांत भोसले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी सायली संतोष कार्वे ही तिचे मुळ गावी किन्हई (ता. कोरेगाव जि. सातारा) येथे आहे.
सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांना कळविल्याने त्यांनी कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे तपास पथकाचे पो. उप. निरीक्षक स्वप्निल पाटील व स्टाफ यांनी जावून आरोपी महिलेस ताब्यात घेतले.
तिला नाव पत्ता विचारता तिने तिचे नाव सायली संतोष कार्वे (वय २२ वर्षे रा.मु.पो. किन्हई ता. कोरेगाव जि. सातारा) असल्याचे सांगितले. तिच्याकडे चौकशी करता तिने कल्याणीनगर भागात लहान मुलाचा सांभाळ करणेचे काम मिळवून घरात प्रवेश करुन तेथील घरात चोरी केल्याची कबूली दिली.
सदर महिलेस अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपी कडून १३,११,८००/- रु. किंमतीचे चे सोन्या – चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच तिच्याकडे अधिक तपास करता तिने आंबेगाव परिसरात सुध्दा एका घरात लहान मुलगा सांभाळण्याचे काम मिळवून तेथे सुध्दा चोरी केल्याची कबुली दिली.
त्यावरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशनच्या या गुन्हयातील ४,००,०००/- किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. असे एकूण २ गुन्हे उघडकीस आणून १७,११,८००/- रु. किंमतीचे सोन्या चांदीचे दागिनेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४, विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, विठ्ठल दबडे, येरवडा पोलीस स्टेशनचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उप निरीक्षक प्रदिप सुर्वे, पोलिस अमंलदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, कैलास डुकरे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले यांनी केलेली आहे.