जनावराची वाहतूक करताना प्रमाणपत्र बंधनकारक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सोलापूर : बकरी ईद हा सण १७ जून रोजी असून दि. १७ ते २० जून या कालावधीत ईद सणनिमित्त मोठ्या प्रमाणावर जनावरांची कत्तल किंवा कुर्बानी देण्यात येत असते.
या कालावधीत जनावरांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. जनावरांची ही वाहतूक करण्यासाठी प्राणी छळ प्रतिबंधक कायदा अंतर्गत वाहतूक अधिनियम २००१ मधील नियमाप्रमाणे वाहतूक प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
तरी पोलीस, पशू संवर्धन, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यासह अन्य संबंधित शासकीय यंत्रणांनी जनावरांची अवैध वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात बकरी ईद निमित्त महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा १९७६ व महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा १९९५ च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार मार्गदर्शन करत होत्या.
यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर सिंह गवारे, प्र.जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. भास्कर पराडे, सहाय्यक आयुक्त डॉ. विशाल येवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार, सोलापूर महापालिका सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर गिडे यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार पुढे म्हणाले की, राज्यात ४ मार्च २०१५ पासून महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९९५ लागू करण्यात आलेला आहे. यातील सुधारित अधिनियमाप्रमाणे गाई, वळू किंवा बैल यांची कत्तल करणे, कत्तलीसाठी वाहतूक व निर्यात करणे प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
या अधिनियमाप्रमाणे जिल्ह्यात सर्व शासकीय यंत्रणांनी दिनांक १७ ते २० जून २०२४ या कालावधीत या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी व जिल्ह्यात कोठेही जनावराची अवैध वाहतूक होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.
पोलीस व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी जिल्ह्यात प्रत्येक चेक पॉइंटवर प्रत्येक वाहनाची तपासणी करावी व जनावरांची वाहतूक नियमाप्रमाणे वाहतूक केली जात आहे का याची खात्री करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. जनावरांना इयर टॅगिंग नसेल तर जनावरांची वाहतूक करता येत नाही.
बकरी ईद दरम्यान वाहतूक करताना प्राणी छळ प्रतिबंधक कायदा १९६० मधील वाहतूक नियमाप्रमाणे होते किंवा कसे याबाबत पोलीस विभाग परिवहन विभाग व पशुसंवर्धन विभाग यांच्याकडून संयुक्त तपासणी अत्यंत काटेकोरपणे करण्यात यावी.
तसेच कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक होत असेल तर वाहतूक होणाऱ्या जनावरांचे वाहतूकीपूर्व स्वास्थ्य तपासणी करून त्यांनी विहित नमुन्यातील प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
प्रारंभी प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पराडे यांनी बकरी ईद निमित्त प्राणी रक्षण कायदा १९७६ व महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदे १९९५ च्या आम्लबजावणीच्या अनुषंगाने कायद्यातील विविध तरतुदीची माहिती दिली.
प्रादेशिक परिवहन कार्यालय,सोलापूर महानगरपालिका, जिल्ह्यातील विविध नगरपालिका, महसूल विभाग, पोलीस विभाग व पशुसंवर्धन विभाग यांनी करावयाच्या कामकाजाची सविस्तर माहिती बैठकीत दिली.
