अरिहंत जागृती मंचच्या वतीने आयोजन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : अरिहंत जागृती मंच, पुणे तर्फे “आधुनिक युगात जैन श्रावकाचार” या विषयावरील निबंध स्पर्धेचा पारितोषिक प्रदान समारंभ उत्साहात पार पडला. जैन धर्माचे अभ्यासक सुमतीलाल भंडारी यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. डॉ. प्रवीण पगारिया व शोभा कांकरिया यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले.
अरिहंत जागृती मंच, पुणे तर्फे दर वर्षीप्रमाणे यावर्षीही भ. महावीर जन्मकल्याणक निमित्त “आधुनिक युगात जैन श्रावकाचार” या विषयावर खुली निबंधस्पर्धा आयोजित करण्यात आली. या निबंध स्पर्धेत १२२ लोकांनी भाग घेतला.
खुली निबंध स्पर्धा असल्यामुळे ज्येष्ठांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातून मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये निबंध आले. अजैन लोकांनीही निबंध लिहून पाठवले.
या स्पर्धेचा पारितोषिक प्रदान सोहळा महावीर प्रतीष्ठान, पुणे येथे झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शुद्धात्मप्रकाश जैन (अध्यक्ष, जैन अध्ययन केंद्र, सोमैया विश्वविद्यालय, मुंबई) तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संजय सोनवणी (जेष्ठ इतिहास संशोधक) उपस्थित होते.
सर्व पारितोषिक विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, व “जैन धर्म-प्राचीन स्वतंत्र धर्म”, “जैन सम्राट चंद्रगुप्त मौर्य : एक शोध” आणि “जैनांचे मराठी भाषेतील योगदान” ही पुस्तके आणि रोख रक्कम देऊन पुरस्कृत करण्यात आले.
जैन धर्माचे अभ्यासक सुमतीलाल भंडारी यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. डॉ. प्रवीण पगारिया आणि शोभा कांकरिया यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले. खालील स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले – १) निखिल खराडकर २)अंजली चवरे ३) उज्वला भोंगाडे ४) अॅड. राम धुमाळ ५) मृणाल जैन ६) सुप्रिया करोळे ७) निखार रातडिया, मंदसौर, मध्य प्रदेश तसेच नागपूर येथील भगिनी १) मनस्वी कोठारी २) पलक कोठारी यांना युवा उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
अरिहंत जागृती मंच अध्यक्ष राजेंद्र सुराणा यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी मंचाने केलेल्या कामाची आणि पुढे होणाऱ्या कामाची माहिती दिली. तसेच जैन धर्माच्या स्वतंत्र अस्तित्वाला धक्का देणाऱ्या काही घटनांचा उल्लेख करून समाजाला जागृत राहून कृती करण्याचे आवाहन केले.
परिक्षक पद्मा बांठिया यांचे मनोगत त्यांनी पाठवलेली ऑडिओ क्लिप लावून ऐकवण्यात आले. विषय नीट समजून घेऊन निबंध लिहावा असे त्यांनी स्पर्धकांना सांगितले. प्रमुख पाहुणे डॉ. शुद्धात्मप्रकाश जैन म्हणाले कि, बरेच वेळेला दिसून येते की नवीन पीढी अर्धवट ज्ञान संपादन करून आपले मत बनवते. श्रद्धा आणि विवेकाने जो कर्म करतो तोच खरा श्रावक! श्रावक धर्माचे कसोशीने आचरण हाच मोक्षा पर्यंत घेऊन जाणारा मार्ग आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय सोनवणी म्हणाले, आपली संस्था अशा प्रकारच्या निबंधस्पर्धा घेत आहे, समाजात खरे श्रावक तयार करण्याचे कार्य करत आहे, त्यासाठी मी अरिहंत जागृती मंचाचे मनापासून अभिनंदन व कौतुक करतो.
सध्या कॉपी पेस्टचा जमाना दिसून येत आहे. त्यामुळे आपली विचारधारा, बुद्धिमत्ता संपत चालली आहे. जैन धर्माची महानता आपल्याला समजावी लागेल. महाराष्ट्राचे जैन धर्माशी नाते सुमारे २३०० वर्षांचे आहे. जैन धर्माचा इतिहास सांगणारी अनेक पुस्तके आहेत, त्यातील ज्ञान आपण आत्मसात केले पाहिजे, नाहीतर आपले जीवन व्यर्थ जाऊ शकते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्पर्धेचे समन्वयक श्रीपाल ललवाणी यांनी केले. शांतीनाथ जैन व अजय ललवाणी यांनी पाहूण्यांचा परिचय करून दिला. विजय पारख यांनी पारितोषिक विजेत्यांची नावे घोषित केली. संजय चोरडिया (जैन जागृती, पुणे), स्व. चांदकुंवरबाई नवलखा यांच्या स्मरणार्थ शांतीलाल नवलखा आणि महावीर प्रतिष्ठान यांचे विशेष सहकार्य लाभले.
नितीन शहा, जवाहर गुमते, संकेत मुनोत, अजित पांढरे, अमित जोगी यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. पारितोषिक प्रदान कार्यक्रमाला जय आनंद ग्रुप, वीतराग सेवा संघ, जैन सोशल ग्रुप पुणे, आनंद जैन विचार मंच या संघटनांचे सभासद तसेच समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सलग ७ वर्षे जैन धर्मासंबंधी विषयावर निबंधस्पर्धा घेणाऱ्या अरिहंत जागृती मंचाचे समाजातील सर्व थरातून कौतुक होत आहे.