महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
वाशी : वाशी तालुक्यातील गोलेगाव (कागदे) मुळगाव येथील उत्तम कळसे यांची कन्या व उपळाई ठोंगे (ता. बार्शी सध्या हडपसर पुणे) येथील सदावर्ते कुटुंबाची सुनबाई धनश्री सदावर्ते – कळसे यांनी जिद्दीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे. मंत्रालयात सहायक कक्ष अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे. या यशाबद्दल ग्रामस्थांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
उपळाई ठोंगे येथील धनश्री श्रीकांत सदावर्ते – कळसे याची नुकतीच सहायक कक्ष अधिकारी (मंत्रालय वर्ग २) पदी निवड झाली. त्यांचे वडील उत्तम कळसे हे पंचायत समितीमध्ये अधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत तर आई संगीता गृहिणी आहे.
धनश्री यांचे प्राथमिक शिक्षण जिजामाता विद्या मंदिर बार्शी, माध्यमिक शिक्षण जिजामाता कन्या प्रशाला बार्शी येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण राजर्षी शाहू कॉलेज, लातूर येथे झाले. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथे बी.टेक. पदवी घेतली.
सहायक अधीक्षक म्हणून कृषी कार्यालय, पुणे येथे कार्यरत असताना त्यांनी कौटुंबिक जबाबदारी यश स्वीरीत्या सांभाळत शासकीय स्पर्धा परीक्षेची तयारी केली. अचूक नियोजन, अभ्यासातील चिकाटी, सातत्य व आत्मविश्वासाच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्यांची सहायक कक्ष अधिकारी (मंत्रालय वर्ग २) पदी निवड झाली.
त्यांच्या यशामध्ये त्यांचे पती श्रीकांत, सासू सुरेखा, सासरे सूर्यकांत सदावर्ते यांचा मोलाचा वाटा आहे. कुलवंत वाणी समाज ट्रस्टच्या सर्व समन्वयकांच्या वतीने अभिनंदन होत आहे. यावेळी रवींद्र गोलांडे, अमोल सिद्ध, विश्वनाथ वासकर, श्रीकांत सदावर्ते, प्रवीण शेटे, दंडनाईक, प्रकाश खोले, विनोद शेटे आदी यावेळी उपस्थित होते.
