महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : येथील श्रुतभवन संशोधन केंद्रात केनिया, आफ्रिका, नेपाळसह विविध देशातून आलेल्या प्राध्यापकांची बैठक झाली. इंटरनॅशनल स्कूल फॉर जैन स्टडीजचे निर्देशक श्रीनेत्र पांडे, डॉ. के. के. नौलाखा आणि भारतातील विविध विद्यापीठांतील प्राध्यापकांनी बुधवारी श्रुतभवनला भेट दिली.
गणिवर्य श्री वैराग्यरतिविजयजी म.सा. यांच्या मार्गदर्शनाखाली श्रुतभवन संस्थेमध्ये प्राचीन हस्तलिखितांवर संशोधनाचे कार्य सुरु आहे. आपल्या संशोधनासाठी अपेक्षित सामग्री आणि संदर्भ एकत्रित करण्यासाठी देश-विदेशातून विद्वान् संस्थेस भेट देऊन उपयोगी साहित्य आणि मार्गदर्शन प्राप्त करीत आहेत.
श्रुतभवनच्या संशोधन विभागाचे प्रमुख अमित उपाध्ये यांनी सर्वांना येथे सुरू असलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. या बैठकीत उपस्थित प्राध्यापकांनी श्रुतरत्न गणिवर्य श्री वैराग्यरतिविजयजी म.सा. यांच्याशी संवाद साधला.
पूज्य गुरुदेवांनी अपरिग्रह, जैन श्रमण परंपरा, अनेकांतवाद, जैन धर्माची आचारपद्धती आणि भगवान महावीरांच्या सहअस्तित्वाच्या तत्त्वावर मार्गदर्शन केले. श्रुतभवनातील प्राचीन हस्तलिखितांचे संशोधन आणि सूचिपत्र निर्माण करण्याचे कार्य पाहून प्राध्यापक प्रभावित झाले.
त्यांनी श्रुतभवनच्या कामाचे कौतुक केले. दक्षिण आफ्रिकेचे प्रोफेसर हर्बर्ट मोयो म्हणाले की, श्रुतभवन हे प्राचीन धर्मग्रंथांचे जतन आणि पुढील पिढीला ज्ञान देण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. डॉ. के. के. नौलखा म्हणाले की, श्रुतभवन प्राचीन ज्ञानसंपदा जतन करण्यासाठी महत्त्वाचे केंद्र आहे.
SJS चे निर्देशक श्रीनेत्र पांडे यांनी जैन तत्त्वज्ञान आणि प्राकृत भाषांच्या अभ्यासाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. विदेशी प्राध्यापकांनी श्रुतभवनाच्या कार्याचे कौतुक केले व आम्ही यापुढे शाकाहारी जीवन जगू असे सांगितले.
श्रुतभवन संशोधन केंद्राचे विश्वस्त. राजेंद्र बाठिया, नरेंद्र छाजेड, किशोर ओसवाल, मनोज शहा आणि अदिती शहा या वेळी उपस्थित होत्या. श्रुतभवनने प्रकाशित केलेली पुस्तके आणि हस्तलिखितांचे सूचिपत्र तसेच प्राचीन लेखनसामग्रीचे प्रदर्शन उपस्थितांनी पाहिले.
