महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पार्टटाइम जॉब हवा असेल तर वेगवेगळ्या वेबसाइटवर रिव्ह्यू आणि रेटिंग दिल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून ज्येष्ठाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रफुल्ल वसंतराव सम्मनवार (वय ६३, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पार्टटाइम जॉब वर्क फ्रॉम होम द्वारे चांगले पैसे कमावता येतील, असा मेसेज तक्रारदार यांच्या व्हॉट्सअॅपवर आला. दररोज ५०० ते १,००० रुपये कमावण्याची संधी आहे, असे सांगितले.
तक्रारदार यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले. सुरुवातीला टास्क पूर्ण केल्याचा मोबदला देऊन विश्वास संपादन केला. पैशांची गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल, असे सांगून तब्बल ३९ लाख ६५ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. मात्र काहीही परतावा मिळाला नाही त्यामुळे हडपसर पोलिस ठाण्यात सायबर कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
