खडक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पानटपरी दुकानदाराने सिगारेट न दिल्याच्या रागातून एका युवकाने त्याला जबर मारहाण करून वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भवानी पेठेतील एका साठ वर्षांच्या टपरी चालकाने खडक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ही घटना 11 जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. भवानी पेठेत फिर्यादी यांची पान टपरी आहे. गुरूवारी सायंकाळी एका तरुणाने त्यांना सिगारेट मागितली. मात्र त्याने दिलेल्या पैशावरून दोघात शाब्दिक वाद झाला. तो वाढत गेला.
त्यावेळी तरुणाने त्यांच्या डोक्यात लोखंडी हत्याराने घाव घातला. व त्यांना जबर मारहाण केली त्यात ते जखमी झाले. रागाच्या भरात या तरुणाने समोर उभ्या असलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या.
हत्यार उगारून परिसरात दहशत निर्माण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी धावले. पण हल्लेखोर तरुण तिथून पसार झाला होता. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून हा तपास पोलिस उप निरीक्षक आकाश वीटे करीत आहेत.
