वर्धमान प्रतिष्ठानमध्ये बहुमोल मार्गदर्शन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : आपल्या आनंदाला कोणीही कमी करू शकत नाही. कारण ते आत्म्याचे पूर्णत्व आहे. पूर्णत्व कमी अधिक होत नाही. त्यामुळे घृणा, ईर्षा या गोष्टी कमी जास्त होऊ शकतात परंतु आनंद अक्षय आहे, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले.
वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने आयोजित प्रवचनमालेत पद्मश्री प. पु. आचार्य चंदनाजी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, जीवनातील शांती, क्षमा, प्रेम व आत्म्याचे गुण कधीही कमी होत नाही. जीवनाचा आनंद आत्म्यातून येतो. जे आपले आहे ते शून्य आहे.
ओम पूर्णमिदम यात आपल्या पूर्वजांनी, ऋषींनी ही पूर्णत्वाची संकल्पना मांडलेली आहे. पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, एक शुभ मार्गाने नेणारा रस्ता आहे व एक अशुभ मार्गाचा रस्ता आहे. तो जीवनात लक्षात घ्यायला हवा. आपले ग्रंथ अडीच हजार वर्षांपूर्वीचे आहेत.
भगवान महावीर यांच्या महापरिनिर्वाणानंतर ९८० वर्षानंतर सगळे ज्ञान ग्रंथरुपाने मांडले गेले. जीवनातील सूक्ष्मतेवर खूप सुंदर रीतीने त्यात विवेचन करण्यात आले आहे. ज्याचा शरीराशी संबंध आहे ते बाह्य तप आहे.
अंतर्गत तप हे दिसत नाही. ते अंतर्गत जीवनाशी संबंधित आहे. तपाचा अनुभव विलक्षण असतो. आपल्या आत्म्याचे शुभभाव हे अनंत आहेत. त्याची कोणतीही सीमा नाही. जे अशुभ आहे ते मर्यादित आहे. त्याचे दुष्परिणाम अधिक आहेत. आपल्याला शांत, मौन राहायचे असेल तर ते कितीही काळासाठी करता येऊ शकते.
प. पु. साध्वी श्री शिलापीजी म्हणाल्या, जी गोष्ट आपण लहानपणापासून करत नाही ती गोष्ट मोठेपणी अचानक सुरू करणे जरा अवघड जाते. पुन्हा मागे फिरून आपल्याला आपले आयुष्य जगता येत नाही. लोक बदलतील तर जीवन बदलेल असे आपल्याला वाटत राहते. परंतु खरे तर जेव्हा आपण बदलतो तेव्हा खऱ्या अर्थाने जीवन बदलते.
लोकांवर काहीही अवलंबून नाही. स्वतःच स्वतःवर अवलंबून आहे. स्वतःला बदलण्याचा मार्ग म्हणजे विचार आणि चिंतन आहे. जीवन टप्प्या टप्प्यावर बदलत जाते. आपली इच्छा असेल तर जीवन बदलेल आपलीच इच्छा नसेल तर खुद्द महावीर भगवन आले तरी आपले जीवन बदलू शकणार नाही. त्यामुळे मला बदलायचे आहे हा आपला पहिला संकल्प असायला हवा.
आपण छोट्या छोट्या गोष्टींनी उद्विग्न होतो. ईश्वर रस्ता दाखवेल परंतु चालावे आपल्यालाच लागणार आहे. हे लक्षात घ्यायला हवे. निर्जरा हे परिवर्तनाचे साधन आहे हे लक्षात घ्या.
प. पु. साध्वी श्री शिलापीजी पुढे म्हणाल्या, प्रायश्चित हे तप आहे.
स्वतःच्या चुका स्वीकारून क्षमा मागणे हेसुदधा मोठे तप आहे. भोजन न करणे हे तुलनेने सोपे तप आहे. परंतु क्षमायाचना ही मोठी तपसाधना आहे. इतरांनी आपल्या चुका दाखवल्या तर आपण त्याला शत्रू मानतो पण त्या गोष्टींचा स्वीकार करणे ही मोठी गोष्ट आहे.
















