उपमुख्यमंत्री अजित पवार : खेळासाठी अद्ययावत सुविधा देणार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘ऑलिम्पिक’ मध्ये देशाला कांस्यपदक मिळवून देवून जिल्हा, राज्य आणि देशाचे नाव उंचावणाऱ्या स्वप्नीलला घडवणाऱ्या त्याच्या आई-वडिलांना सॅल्युट. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे ऋण व्यक्त केले. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक कर्तबगार खेळाडू असून खेळाला चालना देण्यासाठी अद्ययावत सुविधा देण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पॅरिस येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये 50 मीटर रायफल थ्री प्रकारात नेमबाज स्वप्नील कुसाळे याला कांस्य पदक मिळवल्याबद्दल त्याच्या आई अनिता व वडील सुरेश कुसाळे यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
हा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरीत करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गजापूर येथे झालेल्या घटनेत नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना एकूण एक कोटी 49 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार असून आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 20 नुकसानग्रस्तांना 53 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला.
तसेच जुलै 2024 मधील महापुरात शिरोळ तालुक्यातील अकिवाट – बस्तवाड ओढ्याच्या पुलावर ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन मृत झालेल्या सुहास पाटील, अण्णासो हसुरे व इकबाल बैरागदार यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.