विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
पुणे : पुणे शहरात आरक्षणासाठी रविवारी (ता. ११) निघालेल्या शांतता रॅलीमध्ये चोरट्यांनी सोनसाखळी, मोबाईल आणि रोकड चोरी केल्याच्या घटना घडल्या. मोठ्या संख्येने लाखो नागरिक सहभागी झाले होते. त्या गर्दीचा चोरट्यांनी गैर फायदा घेतला. रविवारी या घटनामध्ये सुमारे नऊ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला.
या प्रकरणी विश्रामबाग आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कात्रज पासून सारसबाग मार्गे ही रॅली डेक्कनला आली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात रविवारी शहरातून मराठा आरक्षणासाठी शांतता रॅली काढण्यात आली.
या रॅलीत मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी नागरिकांची सोनसाखळी, मोबाईल आणि खिशातील रोकड चोरून नेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाजीराव रस्त्यावरील कडबे आळी तालीम चौकाजवळ एका तरुणाची ९२ हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत प्रणय लक्ष्मण पळसकर (वय ३२, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सारसबाग गणपती मंदिरासमोर आणि स्वारगेट परिसरातील देशभक्त केशवराव जेधे चौकात ८५ हजार रुपये किमतीच्या दोन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. याबाबत प्रकाश सुरेश सूर्यवंशी (वय ४२, रा. नन्हे) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सारसबागेजवळ सूर्यवंशी यांची सोनसाखळी चोरीस गेली.
तर, स्वारगेट परिसरात चोरट्याने दत्ता तुपे यांची सोनसाखळी चोरून नेली. पूरम चौकात बाळासाहेब ज्ञानेश्वर पिलावरे (वय ५४, रा. खडकमाळ आळी) यांच्या खिशातून चोरट्यांनी ५७ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याबाबत त्यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
चोरट्यांनी जेधे चौकात दीपक बापू बांदल (वय ३७, रा. वडाचीवाडी, ता. हवेली) यांची सव्वातीन लाख रुपये किमतीची सोनसाखळी चोरून नेली. तसेच, सत्यवान लक्ष्मण जगताप (वय ५१, रा. माळेगाव, ता. बारामती) यांची ही सव्वातीन लाख रुपये किमतीची सोनसाखळी चोरीस गेली.