प.पु. श्री सुप्रियदर्शनाजी म.सा. यांनी बिबवेवाडी जैन स्थानकात केले मार्गदर्शन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सर्वमान्य आहे की द्रव्यरूपी मालमत्ता आपल्याला इथेच सोडावी लागते. ती आपल्याबरोबर पुढच्या प्रवासासाठी येत नाही, तर कर्मरूपी मालमत्ताच आपल्याबरोबर पुढे येते. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी आवश्यक तेवढीच मालमत्ता कमावून, जास्तीत जास्त सत्कर्माची कमाई करण्याचे उद्दिष्ट आपण जीवनात ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन प.पु. श्री सुप्रियदर्शनाजी म.सा. यांनी बिबवेवाडी जैनस्थानकात केले.
प. पु. श्री सुप्रियदर्शनाजी म. सा. प्रवचन मालेत मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, या जीवनात सर्व मानवांना ३ योग (मन, वचन आणि काया) सारखेच मिळालेले असतात आणि त्यांचा उपयोग करूनच सर्व कार्ये केली जातात.
सत्कर्माची कमाई करण्यासाठी तीन योगांद्वारे तीन मार्गांचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे. हे तीन मार्ग भगवान महावीर स्वामींनी आपल्या उपदेशांद्वारे सांगितले आहेत :
१) चांगले विचार : सर्व कर्मांचे उगमस्थान विचार असतात. जसे विचार, तशी प्रवृत्ती आणि तसे कर्मबद्धन होते. वाईट विचार वाईट कृत्य करण्यास प्रवृत्त करतात आणि दुष्कर्माचा बंध होतो. चुकीचे औषध कधीही रोग बरा करू शकत नाही; त्याप्रमाणे वाईट विचार कधीही चांगले कर्म करू देणार नाहीत, ज्यामुळे जुने कर्म क्षय होण्याऐवजी नवीन कर्माचा बंध होत राहील. नेहमी चांगले विचार शुभ फल देतात आणि सत्कार्य करण्यास प्रवृत्त करतात. आपण जसा विचार करतो, तसेच आपल्या आयुष्यात घडत असते; त्यामुळे विचार अतिमहत्त्वाचे आहेत.
२) सतत चांगले कार्य करणे : एकदा सत्कार्य केल्यानंतर न थांबता पुन्हा पुन्हा सत्कार्य करत राहिले पाहिजे. एकदा खाल्ल्याने पोट भरत नाही, वारंवार खावे लागते, त्याप्रमाणे एकदा सत्कार्य करणे पुरेसे नसते; ते जीवनात सतत करत राहिले पाहिजे.
३) चांगले शब्द बोलणे : “सर्वांना ओठ हे धनुष्याच्या आकाराचे दिलेले आहेत, पण त्यातून शब्दांचे बाण असे सोडा की, त्याने समोरच्याच्या हृदयाला छेद न लागता, स्पर्श झाला पाहिजे.” सर्वकाही शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होत असते.
भगवान महावीर स्वामी सांगतात की, सत्य बोलताना सुद्धा योग्य शब्दांचा वापर करणे गरजेचे आहे, जेणेकरून ऐकणाऱ्यावर त्यांचा आघात होणार नाही. या तीन मार्गांचा आपल्या जीवनात अवलंब केल्यास आपले जीवन सार्थक करता येईल.
आपण नेहमी म्हणतो की परमेश्वर माझ्या सोबत आहे, परंतु आपण कधी विचार केला आहे का की मी परमेश्वराच्या जवळ आहे का? मी परमेश्वराच्या मार्गावर आहे का? भगवान महावीर स्वामींनी “श्री आचारांग सूत्र” मध्ये परमेश्वर बनण्याचा मार्ग सांगितला आहे.
सर्व सत्पुरुष जे परमात्मा बनले, त्यांनी याच मार्गाचा वापर केला आहे. आपण या मार्गावर आहोत का नाही, हे पाहण्यासाठी आणि परीक्षण करण्यासाठी महापर्व येत आहे. आपल्यातील आपलेपणा गुणरहित असायला पाहिजे.
आपण नेहमी इतरांशी व्यवहार करताना समोरच्या व्यक्तीची पात्रता न बघता सर्वांप्रति समान भावना ठेवणे गरजेचे आहे. आपलेपणा देताना त्यामध्ये कोणताही स्वार्थ असता कामा नये. आज जगात जितके संबंध आहेत, ते सर्व इच्छाावर अवलंबून आहेत, आणि इच्छा पूर्तता न झाल्यास राग-द्वेष निर्माण होऊन जन्म-मृत्यूचे चक्र वाढवण्यास कारणीभूत होते. नि:स्वार्थ भावनेने, कथारहित भावनेने आपलेपणा देता आला पाहिजे, जसे गुरु आणि शिष्याचे नाते आहे; इथे इच्छारहित समर्पण असते.
