वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त शब्दसुमने
पुणे : जैन तत्त्वानुसार शब्द काय आहेत? तर ते एक स्वतंत्र अस्तित्व आहे. संपूर्ण ब्रह्मांडात शब्दांची शक्ती आहे. याचा अंदाज लावता येईल का? तर नाही. पण जोपर्यंत लोक आहेत, तोपर्यंत शब्दांची देवाण-घेवाण होतच राहील, असे प्रतिपादन पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले.
वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन मालेत त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प. पू. साध्वी श्री शिलापीजी यांनीही मार्गदर्शन केले. पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, “शब्द दूरपर्यंत ऐकायला येतात किंवा दूरवर ऐकू येतात.
ते कुठे-कुठे जातात, माहित आहे का? त्यासाठी शब्द काय आहे हे माहीत असले पाहिजे. या सगळ्या भाषा काय आहेत, त्या कशासाठी जन्माला आल्या आहेत, याचे ज्ञान तुम्हाला असले पाहिजे. कारण तुम्ही सूत्र पाठ करता, त्याने तुम्हाला अर्थबोध होतो, अनुभव येतो. शब्द कुठून येतात, त्याची गती किती आहे याचे तुम्हाला ध्यान असले पाहिजे.
त्यानंतरच तुम्हाला त्याचा अनुभव येईल.” “आपण बोलतो, पण जोपर्यंत आपल्याला त्याचा अनुभव येणार नाही, तोपर्यंत आपण तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. शब्दांचे अर्थ वेगवेगळे असतात, भाव वेगवेगळे असतात. क्रोध, अहंकार, माया, लोभ, भक्तीत रंगलेले हे शब्द असतात. आपल्याला जे जे पाहिजे ते सगळे लोभ आहे.
मग आपली भक्ती म्हणजे देशावरची भक्ती, परिवारावरची भक्ती, जीवनावरची भक्ती, ही लोभाच्या रंगात येते. लोभ हा शुभ पण आहे आणि अशुभ पण आहे. शब्द जेव्हा भक्तीच्या रंगात रंगून येतात, तेव्हा ते शुभ असतात. शब्दांची ताकद संपूर्ण ब्रह्मांडात आहे, त्यामुळे ते तुमची भक्ती महावीरांपर्यंत पोहोचवू शकतात.
शब्द भक्तीचे वैभव आणि त्याची समृद्धीही संपूर्ण ब्रह्मांडातील ईश्वरांपर्यंत पोहोचवते. त्यामुळे त्याची शक्ती अनंत आहे. विश्वाच्या त्या अद्भुत शक्तीचा आपण अनुभव करू शकतो.”
“आपल्याला सुख, समृद्धी, आनंद शब्दांची ताकद देऊ शकतात. शब्दांबरोबर त्यांचे भावही समोरच्यापर्यंत पोहोचवायला शिका.
कारण शब्दांबरोबर त्यांचे भावही गती करतात, त्यामुळे भाषा प्राप्त करणं सोपी गोष्ट नाही.” “पर्युषण म्हणजे आचारशुद्धी. १२ महिन्यांमधला सर्वात चांगला ऋतू म्हणजे वर्षा. हा सगळा आरंभ शांतीचा असतो, त्यामुळे शांतीबरोबर साधनाही आली पाहिजे.
वर्षातला एक दिवस साधनेचा ठेवा. जर आपण एखादं चांगलं काम केलं तर त्याला ‘इच्छामी सुतरम’ असे म्हणतात. या वर्षात चांगले काम करत राहणं, ते विस्तारणं, जीवनाची चांगली प्रक्रिया आहे. स्वर्गाची ही आवश्यक प्रक्रिया आहे.
या प्रक्रियेची ६ आवश्यक अंगं आहेत. आपल्या जीवनाची शुद्धी करणे पहिल्यांदा आवश्यक आहे. त्यात शरीराची शुद्धी बरोबर, आपली मन शुद्धी आवश्यक आहे. शब्दांमध्ये खूप मोठी ताकद आहे. जी शक्ती परमेश्वरांमध्ये आहे, तीच आपणही अनुभवू शकतो, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.”















