बिबवेवाडी जैनस्थानकात प्रवचनात केले मार्गदर्शन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : या जगात माणूस बाहेर सुखाचा शोध घेतो, पण खरा आनंद स्वतःमध्येच असतो. जर आपल्याला आनंद मिळवायचा असेल, तर त्यासाठी एकच गुरुकिल्ली आहे आणि ती म्हणजे आपला आत्मा. आपला आत्मा आपला शत्रू आहे आणि आपला मित्रही आहे. हाच आत्मा दु:खाचा कर्ता आणि सुखाचा कारकही आहे, असे विचार प.पु. श्रीसुप्रियादर्शनाजी म.सा. यांनी व्यक्त केले.
बिबवेवाडी जैनस्थानकात प्रवचनात त्या बोलत होत्या. उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, लाखो वर्षांपासून एकच प्रश्न निर्माण होत आहे की या मानवी जीवनाचे प्रयोजन काय? मनुष्य सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुख मिळविण्यासाठी भटकत असतो.
सुख मिळविण्यासाठी ब्रह्मचारी ब्रह्मचर्य संयम पाळतो, विद्यार्थी अभ्यास करतो, व्यापारी व्यवसाय करतो, पण सुख प्राप्त करण्यास असमर्थ असतो. मनुष्य आणि आपला आत्मा अनादी काळापासून या सुखाच्या शोधात भटकत आलेला आहे. भगवान महावीर म्हणतात की या जगात डोंगराएवढे दु:ख आणि मोहरीच्या दाण्याएवढे सुख आहे.
या भौतिक जगात सुख-सुविधा आणि सुखसोयींची भरभराट आहे. बटण दाबल्यावर सर्व काही उपलब्ध होते. हे सुख मिळवण्यासाठी जगातील प्रत्येक व्यक्ती तळमळत असते. प्रत्येक मुलाला आनंद हवा असतो. प्रत्येक जण आनंदाची गुरुकिल्ली शोधत आहे.
भगवान महावीरांनी तर स्वर्गातील देवताही सुखी नाहीत, असे म्हटले आहे. सध्या अनेकांनी पैशाला सुख मानले आहे. जेव्हा तुमच्याकडे पैसे असतात, तेव्हा तुमचे हजारो मित्र असतात; या जगात प्रत्येकजण सुखाचा साथीदार आहे.
सत्संग आपल्यासाठी जीवनात महत्त्वाचा आहे. आनंदाचे स्पष्टीकरण देताना दोन प्रकारचे सुख सांगितले आहे – एक भौतिक आणि दुसरा आध्यात्मिक आनंद. सध्या भौतिक सुख सर्वांनाच आवडते. खाणे, पिणे, प्रवास करणे, मौजमजा करणे, कपडे घालणे यात माणसाने आपले आयुष्य वाया घालवले आहे.
संत तुम्हाला उठवायला येतात. जो साखर खातो, त्याला तोंड गोड लागेल. धर्म हा नेहमी साखरेसारखा असतो. त्यातून आनंद मिळतो. आपल्याला कोणता आनंद आवडतो, हे आपणच ठरवायचे आहे.
या जगात फक्त दु:ख आहे. आनंद जगात कुठेच दिसत नाही. जगात आनंदी असलेल्या एका व्यक्तीचे नाव सांगा.
संतान नसल्यामुळे दुःखी, मूल न झाल्यामुळे दुःखी, पैसे नसल्यामुळे दुःखी, कुणाकडे खूप पैसा आहे पण शरीर आणि मनाला शांती नाही, तब्येतीचे दुःख आहे. संकट आले की आपण देवाचे स्मरण करतो. दुःखाचे खरे कारण आहे “मी” आणि “माझे” ही भावना. “मी-माझे” आपल्यामध्ये अहंकार आणि आसक्तीची भावना वाढवते.
आपल्या जीवनात प्रत्येक क्षणी सुख-दुःख येत असते. जिथे सुख आहे, तिथे दु:ख आहे. म्हणूनच भगवंत प्रभू महावीरांनी सांगितले आहे की, आपल्या अंतरात्म्यात असीम आनंद आहे, पण आपण बाहेर आनंद शोधत आहोत. आपल्याला फक्त दार उघडण्याची गरज आहे.
दुःखापासून सुखाकडे जाण्याचे तीन मार्ग आहेत: १) प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख मानले पाहिजे; ते आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे. २) सतत दुसऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. “घ्या” पेक्षा “द्या” यामध्ये विश्वास असायला पाहिजे. घेण्यामध्ये दुःख आहे, देण्यात आनंद आहे.
घेतानाचा फोटोपेक्षा देतानाचा फोटो चांगला येतो आणि सर्वांना आवडतो. ३) प्रत्येक गोष्टीला दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा स्वतःलाच जबाबदार धरायला शिकले पाहिजे. जे घडत आहे ते माझे कर्म आहे, याचा स्वीकार केला पाहिजे. विनय, नम्रता यांचा जीवनात स्वीकार आणि अनुकरण केल्यास आपल्यातला अभिमान जाऊन स्वाभिमानाचा प्रकाश होऊन अहंकाराचा नाश होतो.















