चतुःश्रृंगी पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गाड्यांची तोडफोड व कोयत्याने मारहाण प्रकरणी दाखल मोक्का गुन्ह्यातील १८ महिन्यांपासून फरारी असलेल्या सराईत आरोपीला चतुःश्रृंगी पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. १७ एप्रिल २०२३ रोजी मध्यरात्री पीएमसी कॉलनी, पांडवनगर, पुणे येथील सार्वजनिक रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड करून सोनू सुनिल अवघडे (वय २५ वर्षे, व्यवसाय: रिक्षा चालक, रा. बिल्डिंग नं. ०१, पीएमसी कॉलनी, पांडवनगर, पुणे) यांना कोयत्याने मारहाण करून जखमी केले होते.
त्याबाबत चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने (खडकी विभाग) करत आहेत. तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रणिल चौगुले यांनी त्यांचे गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळवून पाहिजे असलेला आरोपी शशांक आनंद चव्हाण (वय २४ वर्षे, रा. रूम नं. ०४, बिल्डिंग नं. २२, कावेरीनगर, वाकड, पुणे) याचा स्टाफसह शोध घेतला.
त्याला महादेव कॉलनी, गुजरनगर, डांगे चौक या ठिकाणी शोधून शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. सदर कामगिरी ही सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने (खडकी विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी,
पोलीस निरीक्षक (गुन्हे) युवराज नांद्रे, तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रणिल चौगुले, पोलीस हवालदार श्रीकांत वाघवले, पोलीस हवालदार बाबुलाल तांदळे, पोलीस हवालदार सुधाकर माने, पोलीस हवालदार इरफान मोमीन, पोलीस हवालदार बाबासाहेब दांगडे आणि पोलीस हवालदार श्रीधर शिर्के यांनी पार पाडली.
