लोणीकाळभोर पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अवैधरित्या पेट्रोल, डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून ४८ लाख ०१ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा जणांना अटक करण्यात लोणीकाळभोर पोलिसांना यश आले आहे.
डिझेल चोरीचा शोध घेण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस अंमलदार ढमढेरे, शिवाजी जाधव गस्त घालीत होते. त्यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, थेऊर फाट्याजवळ पुणे-सोलापूर या दुतर्फा वाहतूक असणाऱ्या महामार्गाच्या दक्षिणेस रिकाम्या जागेतील पत्र्याच्या शेडजवळ टँकर घेऊन तेथून पेट्रोल-डिझेल या ज्वलनशील इंधनाचे बॅरलमध्ये काढण्याचे काम सुरू आहे.
अशी माहिती मिळाल्यावर त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांना कळविले. तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके आणि स्टाफ यांना छापा टाकण्याचा आदेश दिला. त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता, ३ टँकरमधून इलेक्ट्रिक मोटारीच्या सहाय्याने डिझेल बॅरलमध्ये काढताना आढळून आले.
सदर छापा कारवाईमध्ये एकूण १६२० लिटर डिझेल मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहे. सदर घटनेबाबत लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अवैधरित्या पेट्रोल, डिझेल चोरी करणारे
१) शुभम सुशील भगत (वय २३ वर्षे, रा. बोरकरवस्ती थेऊरफाटा, ता. हवेली) २) सुशांत राजेंद्र सुभे (वय ३१ वर्षे, रा. बँक ऑफ बडोदाजवळ, थेऊरफाटा, ता. हवेली) ३) रवी केवट (वय २५ वर्षे, रा. बोरकरवस्ती माळीनळा, ता. हवेली) ४) विशाल सुरेश गोसावी (वय ३० वर्षे, रा. वाणीमळा, थेऊरफाटा, ता. हवेली) ५) किरण हरिभाऊ आंबेकर (वय ३१ वर्षे, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) ६) रोहित कुमार (वय २१ वर्षे, रा. बोरकरवस्ती माळीनळा, ता. हवेली) यांना अटक करण्यात आली आहे.
टँकर मालक यांच्या सांगण्यावरून चोरी करत असल्याचे त्यांनी सांगितले. सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके आणि पोलीस अंमलदार रामहरी वणवे, मंगेश नानापुरे, मल्हार ढमढेरे, शिवाजी जाधव, संदीप धुमाळ, बाजीराव वीर, योगेश पाटील यांच्या पथकाने केली आहे.
