कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ऑनलाईन माध्यमातून टास्कच्या बहाण्याने सात लाखांची फसवणूक झाल्याची घटना मोहमदवाडीत घडली आहे. या प्रकरणात एका तरुणाने तक्रार दाखल केली आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २४ जून ते १८ जुलै या कालावधीत घडली आहे. ऑनलाईन माध्यमातून फिर्यादींच्या मोबाईलवर संपर्क करून, ते एका कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी असल्याचे सांगितले.
मुव्ही रेटिंग टास्क पूर्ण केल्यानंतर कमिशन मिळेल असे आश्वासन देण्यात आले. सुरुवातीला फिर्यादींकडून टास्क पूर्ण करून घेतल्यानंतर त्याचे कमिशन त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करून विश्वास संपादन केला. त्यानंतर लिंक पाठवून खाते रजिस्टर करण्यास सांगितले आणि विविध बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.
फिर्यादींकडून टास्क करून घेतल्यानंतर त्याचे कमिशन आणि ट्रान्सफर केलेले पैसे परत न देता एकूण ७,३७,०२४/- रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यात आली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
