सहकारनगर पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील फरार आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सहकारनगर पोलीस आणि गुन्हे शाखा २ यांनी संयुक्तपणे राबवलेल्या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान साहिल हाती लागला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वनराज आंदेकर यांच्या खुनातील आरोपींमध्ये त्याचा समावेश आहे. पोलिस त्याचा शोध घेत होते, परंतु हत्या झाल्यापासून तो फरार होता. युनिट २ चे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सहकारनगर येथील तळजाई टेकडी परिसरात शोध सुरू केला होता.
त्यावेळी त्यांना साहिल हा साईसृष्ठी मंडळाजवळ आला असल्याची पक्की खबर मिळाली. त्यांनी तातडीने पथकासह थेट कारवाई केली. त्याठिकाणी साहिल उर्फ टक्या (वय १९ वर्षे, रा. स.न.१०, वनशिव वस्ती, तळजाई वसाहत, धनकवडी) मिळून आला.
११ सप्टेंबर, बुधवारी रात्री सव्वा अकरा वाजता ही कारवाई करण्यात आली. त्याला अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार संजय जाधव, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख आणि शंकर नेवसे यांच्या पथकाने केली आहे.
