कोथरुड पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सोनसाखळी चोरी करणारे तसेच परराज्यातील गुन्ह्यांमध्ये हवा असलेल्या दोन गुन्हेगारांना कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे.
कोथरुड पोलीस ठाण्याचे तपास पथक अधिकारी आणि अंमलदार चेन स्नॅचिंग गुन्हेगारांचा शोध घेत होते. दि. ३ सप्टेंबर रोजी उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड, पुणे येथे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दोन अनोळखी चोरट्यांनी हिसका मारून चोरी केली आणि मोटारसायकलवरून पळून गेले.
याबाबत कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. आरोपींचा शोध घेण्याच्या अनुषंगाने कोथरुड पोलीस तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर मुळे, आकाश वाल्मिकी, आणि विष्णू राठोड यांनी अथक परिश्रम घेऊन तांत्रिक विश्लेषण करून राकेश गोकुळ राठोड (वय २१ वर्षे, रा. सुप्रीम कॉलनी, एम.आय.डी.सी रोड, जळगाव) आणि आदित्य कुंडलिक माझिरे (वय १९ वर्षे, रा. मु.पो. रावडे, ता. मुळशी, जि. पुणे) यांना अटक केली तपासादरम्यान आरोपीकडून एकूण १,९८,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल (२५ ग्रॅम सोन्याची साखळी, २१ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, एक यूनिकॉर्न मोटारसायकल, मोबाईल इत्यादी) जप्त करण्यात आले आहेत.
तपासादरम्यान, राकेश गोकुळ राठोड हा जळगाव येथील रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे समोर आले असून त्याच्या विरोधात जबरी चोरी, चोरी, घरफोडी, दरोडा यांसारखे १५ गंभीर गुन्हे नोंद आहेत.
तसेच कोथरुड पोलीस ठाण्यातील दोन चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघड झाले आहेत. या प्रकारे आंतरराज्यातील चेन स्नॅचिंग आणि चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप नारायण देशमाने, पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम, तपास पथक प्रभारी अधिकारी सह. पो. निरी. बालाजी सानप, पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी आणि तपास पथकातील अंमलदार अजिनाथ चौधर, ज्ञानेश्वर मुळे, संजय दहिमाते, आकाश वाल्मिकी, विष्णू राठोड, अजय शिर्के, शरद राऊत, आणि मंगेश शेळके यांनी केली आहे.
