वाळूव्यावसायिकावर हल्ला, तिघांना घेतले ताब्यात
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावर एका वाळू पुरवठादार व्यापाऱ्यावर गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये ते जखमी झाले आहेत. ही घटना कात्रज कोंढवा साळवे गार्डन कान्हा हॉटेल चौकाजवळ प्राइड हॉस्पिटल समोर गंगाधामला जाणाऱ्या रस्त्यावर चोरडीया कॉर्नरजवळ घडली. तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप गायकवाड असे जखमी व्यापाऱ्यांचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि.१४) बारा-साडेबाराच्या सुमारास घटना घडली. पोलिसांनी काही तासातच आकाश जगताप (वय २१), तन्मय सखाराम भुसारी (वय १९) आणि एक अल्पवयीन मुलगा अशा तिघांना अटक केली आहे.
श्रीदत्त सप्लायर्सचे संचालक दिलीप गायकवाड हे त्यांच्या दुकानात बसले होते. त्यावेळी मोटारसायकलवर तिघे आले. तिघांनी त्यांना वीट, सिमेंट आहे का अशी विचारणा केली. ती मिळेल असे गायकवाड यांनी सांगितले.
त्यानंतर तिघांपैकी एकाने थेट त्यांच्यावर गोळीबार केला. त्याने तीन गोळ्या झाडल्या त्यापैकी दोन गायकवाड यांच्या पायात घुसल्या तर एक गोळी किडनीजवळ घुसली आहे. त्यामुळे गायकवाड खाली कोसळले.
दुकानातील कामगारांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तो पर्यंत हल्लेखोर पसार झाले. पोलिसांनी अवघ्या दोन तासातच तीन आरोपींना पकडले.















