चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये चौघावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मिम बॉईज यंग फ्रेंड्स सर्कल, मंडळाने वडगावशेरी येथे मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकी दरम्यान झेंडा फिरवताना विजेचा शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी १०:४० वाजता आनंद पार्क रोड, वडगावशेरी येथे ही दुर्घटना घडली. त्यात एक अल्पवयीन मुलगा आणि ट्रॅक्टरवर उभा असलेला जक्रीया बिलाल शेख (वय २० वर्षे, रा. इनामदार शाळा जवळ) यांचा शॉक लागून मृत्यू झाला.
या प्रकरणी पंकज वसंत मुसळे (पोलीस अमंलदार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंडळाचे अध्यक्ष, ट्रॅक्टर चालक, लोखंडी फ्रेम उभारणारा, व डीजे मालकावर निष्काळजीपणामुळे मिरवणुकीचे आयोजन करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही जण फरार आहेत. हा तपास सहाययक पोलीस निरीक्षक पी.एस. माने करीत आहेत.















