रस्त्यावर विक्री करताना पकडले
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने कोंढव्यात कारवाई करत १४ लाख रुपयांचे एमडी जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि त्यांचे अंमली पदार्थविरोधी पोलीस पथक गस्त घालत असताना, त्यांना ओपेल फलक सोसायटी समोर, मलिक नगर, कोंढवा, पुणे येथे सार्वजनिक रस्त्यावर काही तरुण अंमली पदार्थ विकत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार, त्यांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली. जहीर उर्फ साद गनी खान (वय २०) आणि अदनान शाबीर शेख (वय २५, दोघेही रा. कोंढवा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १४ लाख रुपये किंमतीचा ६३ ग्रॅम मॅफेड्रोन (एम.डी.) आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पुणे शहरातील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार अझीम शेख, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, संदीप जाधव, दिशा खेवलकर, साहिल शेख, संदीप शेळके, योगेश मांढरे, अझीम शेख, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, आझाद पाटील यांनी सहभाग घेतला.

