आमदार रवींद्र धंगेकर यांचे पोलिस आयुक्तांना पत्र
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्याच्या कोरेगाव पार्क सारख्या उच्चभ्रू परिसरातील वाडिया महाविद्यालयातील अल्पवयीन मुलीवर झालेली अत्याचाराची घटना दडपण्याचा प्रयत्न प्राचार्य व संस्थाचालक करीत असल्याचा आरोप पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात केला आहे.
काही दिवसापुर्वी वाडिया महाविद्यालयातील अकरावी व बारावीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलीवर चार ते पाच विद्यार्थ्यांनी बलात्कार केला असून त्याचे व्हिडीओ चित्रण व्हायरल केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
दरम्यान या प्रकरणी दोन आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने दोन आरोपींच्या पोलिस कोठडीत मंगळवार (ता. १) पर्यंत वाढ केली आहे.
बाल न्याय मंडळाने अन्य दोन अल्पवयीन आरोपींची बाल निरीक्षणगृहात रवानगी केली आहे.
या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ओम आदेश घोलप (वय २०) आणि स्वप्नील विकास देवकर (वय २२) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.
त्याची शुक्रवारी (ता. २७) मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाकडून आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ केली, तर अन्य दोन अल्पवयीन मुलांना येरवड्यातील बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले.
त्यांची बाल परीक्षणगृहात रवानगी करण्यात आली आहे. हे प्रकरण संस्थेच्या विश्वस्तासह प्राचार्यांनी दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात आमदार धंगेकर यांनी शुक्रवारी (ता. २७) पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांना निवेदन दिले आहे. अत्याचार करणारी धनदांडग्यांची मुले असून, एक जण उपजिल्हाधिकारी सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे त्या विश्वस्ताकडून पीडित मुलीच्या वडिलांवर दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे. संस्थेच्या या विश्वस्ताचे एका मंत्र्याशी संबंध आहेत. त्या मंत्र्याचे नाव घेत महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप धंगेकर यांनी निवेदनाद्वारे केला आहे.
या प्रकरणात एका विद्यमान मंत्र्याचे ही कनेक्शन असल्याचे धंगेकर यांनी पत्रात म्हटले आहे. त्यांच्यावर तक्रार देऊ नये म्हणून संस्थाचालक, प्राचार्य व मंत्र्यांचा प्रचंड दबाव असल्याचेही आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात धंगेकर यांनी म्हंटले आहे.
वाडिया महाविद्यालयातील अल्पवयीन मुलीवर चार मुलांनी लैंगिक अत्याचार केला. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ तयार करून, सोशल मीडियावर प्रसारित केला. अन्य एका मुलीमुळे दहा दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर समुपदेशिकेने हा प्रकार विश्वस्त आणि प्राचार्यांना सांगितला. परंतु त्यांनी दखल घेतली नाही. पीडित मुलीचे वडील याच महाविद्यालयात नोकरी करतात. त्यांनी विश्वस्त आणि प्राचार्यांना भेटून कारवाई करण्याची मागणी केली. परंतु उलट त्यांनी मुलीच्या वडिलांना दमदाटी केली. तसेच कुठेही वाच्यता केल्यास संस्थेकडून कारवाई करण्याची धमकीही दिल्याचे समजते, असे धंगेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.





