बारामती पोलिसांत दोन तक्रारींवरून गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींवर हडपसर परिसरातील मित्राच्या खोलीत चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार १४ सप्टेंबर रोजी उघड झाला होता. याप्रकरणी बारामती पोलिसांनी चौघांना अटक केली होती. आता याप्रकरणी पोलिस तपासात या दोन अल्पवयीन मुलींवर यापूर्वी आणखी सात जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींची संख्या आता ११ झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या फिर्यादी बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या दोन्ही मुली शहरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये नववीत शिकत आहेत.
या प्रकरणात ज्ञानेश्वर भारत आटोळे (वय २७, रा. सावळ), अनिकेत प्रमोद बेंगारे (वय २०, रा. बयाजीनगर, रुई, बारामती), यश ऊर्फ सोन्या शिवाजी आटोळे (वय २१, रा. सावळ, ता. बारामती), व जय ऊर्फ जयेश अशोक मोरे (रा. तांदूळवाडी, बारामती) या चौघांना अटक केली होती.
त्यात आता ऑकार भारती, ओम कांबळे, आप्पा शेंडे, अक्षय मोडक, सूरज इंदलकर, संस्कार वाघमारे व श्रेणिक भंडारी यांची भर पडली आहे. पोलिसांनी तपास सुरू ठेवून मुलींना विश्वासात घेतले.
तसेच यापूर्वी त्यांच्याबाबत असे काही प्रकार घडले आहेत का, याबाबत माहिती घेत सखोल तपास केला. यामध्ये त्यावेळी आणखी सात जणांनी त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले. एका घटनेत बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (POCSO) तसेच अॅट्रॉसिटी आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल केले आहेत.

